टमाटा, कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 05:31 PM2018-09-28T17:31:05+5:302018-09-28T17:31:37+5:30
सिन्नर तालुक्यातील भाजीपाला उत्पादनात सर्वत्र परिचित असणा-या ठाणगाव परिसरातील साठवलेला उन्हाळ कांदा सडला आहे. टमाट्यालाही समाधानकारक भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
गेल्या वर्षी लाल कांदाला समाधानकारक भाव मिळाल्याने यावर्षी सर्वच शेतकºयांनी आपला उन्हाळ कांदा चाळीमध्ये साठवणूक करुन ठेवला होता. कांद्याचे दर आहे तेवढेच राहील्याने शेतक-यांनी आपला कांदा चाळीतच तसाच ठेवल्याने आता चाळीतील कांदा पूर्णपणे सडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाने यावर्षी सुरु वातीपासूनच दांडी मारली पण म्हाळुंगी नदीच्या उगम स्थानी समाधानकारक पाऊस झाल्याने म्हाळुंगी नदी प्रवाहीत झाली. त्या पाण्यावर शेतक-यांनी नर्सरी मधून जादा भावाने टोमॅटोचे रोपे आणून लागवड केली. परिसरातील टमाटे मुंबई येथील वाशी मार्केटला पाठविण्यात येतो, तेथेही दहा किलोस ६० ते ७० रुपये भाव मिळत असल्याने शेतक-यांच्या नावाने बाकी शून्य येत आहे. टमाटा लागवडीस सुरुवातीपासून हवामानातील बदलामुळे खूप महागडी औषधाची फवारणी करु न टमाटे पिके वाचवली होती. आज तोडण्यासाठी आलेल्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अगोदरच आर्थिक गर्तेत सापडलेल्या बळीराजाची अवस्था खूपच बिकट झाली आहे. उन्हाळ कांदा साठवून ठेवल्याने पावसाळ्यात कांद्याला समाधानकारक भाव मिळेल या आशेवर असणारा शेतकरी मात्र कांद्याच्या दरात घसरण झाल्याने हाताश झाला आहे. आपल्या खिशातील पैशाची शेतात गुंतवणूक केल्याने शेतकरी आणखीणच अडचणीत सापडला आहे.