दिंडोरीत टमाटा लागवड लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:03 PM2020-06-26T23:03:22+5:302020-06-27T01:28:15+5:30
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, करंजवण, म्हेळुस्के, परमोरी, अवनखेड, दहेगाव वागळूद आदी भागामध्ये टमाटा लागवड लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोपे मिळत नसल्याने शेतकरीवर्गाला मोठी धावपळ करावी लागत आहे.
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, करंजवण, म्हेळुस्के, परमोरी, अवनखेड, दहेगाव वागळूद आदी भागामध्ये टमाटा लागवड लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोपे मिळत नसल्याने शेतकरीवर्गाला मोठी धावपळ करावी लागत आहे.
पावसाळा सुरू झाला की, या तालुक्यातील शेतकऱ्यांना नगदी पिकांची ओढ लागते. त्यासाठी भांडवल देणारे पीक म्हणून टमाट्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे जून, जुलै महिन्यात रोपे खरेदीसाठी मोठी लगबग सुरू झालेली असते. परंतु यंदा मात्र कोरोनाच्या साथीमुळे नर्सरी व्यावसायिकांना मोठा फटका बसल्यामुळे नर्सरींमध्ये टमाट्याची रोपे उपलब्ध नसल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी टमाट्याची रोपे उपलब्ध होत नसल्यामुळे घरीच गादी वाफ्याची नर्सरी करून रोपे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यात वेळेचा अपव्यय होणार असल्याने हंगाम वाया जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दिंडोरी तालुक्यातील सुमारे तीनशे एकर क्षेत्र टमाटा लागवडीसाठी असते. परंतु यंदा रोपे मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे हे क्षेत्र कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे.
आम्ही दरवर्षी टमाटा पीक मोठ्या प्रमाणात घेत असतो. जून आणि जुलै महिन्यात जवळपास ५० ते ६० टक्के लागवड होत असते. परंतु यंदा कोरोनामुळे नर्सरीमध्ये रोपे उपलब्ध नसल्यामुळे टमाटा पीक आमच्या हातातून जाते की, काय याची भीती वाटते आहे.
- हिरामण मोगल, टमाटा उत्पादक, लखमापूर
टमाटा पिकामुळे आम्हाला द्राक्षे पिके घेण्यासाठी भांडवल मोठ्या प्रमाणात मिळविण्यासाठी मोठी मदत मिळत असते. परंतु यंदा कोरोनामुळे रोपे बुकिंग करूनसुद्धा मिळत नसल्यामुळे याचा परिणाम द्राक्षे हंगामावर होण्याची शक्यता वाटते आहे.
- चिंधू पाटील, टमाटा उत्पादक, दहेगाव
यंदा कोरोनामुळे शेतकरीवर्गाला टमाटा रोपे उपलब्ध करण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. परंतु शेतकºयांनी धीर न सोडता नियोजन करून आपल्या घरी गादी वाफ्याची नर्सरी करून टमाट्याची रोपे तयार करावीत. यंदाचा हंगाम थोडा लांबणीवर जाईल. पण रोपे घरच्या घरी तयार केली तर यांचा फायदा नक्कीच होईल.
- अभिजित जमधडे, कृषी अधिकारी, दिंडोरी