टमाटा अजूनही तेजीत 75 रुपये किलो भाव
By admin | Published: July 12, 2017 12:10 AM2017-07-12T00:10:39+5:302017-07-12T00:10:54+5:30
नाशिक बाजार समिती : बाजारभाव वधारले
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून टमाटा मालाची आवक घटल्याने बाजारभाव टिकून आहेत. सध्या टमाट्याचा हंगाम संपत आल्याने आवक पूर्णपणे घटली आहे. सद्यस्थितीत कळवण तालुक्यातून टमाटे विक्रीसाठी दाखल होत आहे. मंगळवारी बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या टमाटे मालाला लिलावात ७५ रुपये किलो असा बाजारभाव मिळाल्याची माहिती टमाटा व्यापारी गोविंद कुटे यांनी दिली आहे.
बाजार समितीत केवळ १० टक्के टमाट्याची आवक होत आहे. अत्यंत कमी प्रमाणात माल येत असल्याने तसेच ग्राहकांकडून मागणी असल्याने बाजारभाव टिकून आहेत. गंगाघाट व अन्य परिसरांत भरणाऱ्या भाजीबाजारात तसेच भाजीविक्रेत्या हातगाडीवर तर टमाटे १०० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे.
मंगळवारी बाजार समितीत टमाट्याच्या प्रति २० किलो वजनाच्या काही जाळीला तेराशे, तर काहींना पंधराशे रुपये असा बाजारभाव मिळाला आहे. यंदाच्या वर्षी टमाट्याच्या बाजारभावाचा हा उच्चांक असल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.