टमाटा तेजित; ६० रुपये किलो
By admin | Published: July 7, 2017 06:05 PM2017-07-07T18:05:27+5:302017-07-07T18:05:27+5:30
गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतातील उभा टमाटा माल खराब झाल्याने बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या टमाट्याची आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतातील उभा टमाटा माल खराब झाल्याने बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या टमाट्याची आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. आवक घटल्याने टमाट्याचे दर ५० ते ६० रुपये प्रति किलोपर्यंत पोहचलेले आहेत. किरकोळ बाजारात टमाटा ८० ते १०० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे.
पावसामुळे आवक घटल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाट्याचा मोजकाच माल विक्रीसाठी येत आहे. आगामी दोन महिन्यानंतर आॅगस्टमध्ये टमाट्याचा हंगाम सुरू होईल, तोपर्यंत टमाट्याचे दर तेजित राहण्याची शक्यता असल्याचे व्यापारी गोविंद कुटे यांनी सांगितले. बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या २० किलोच्या टमाटा जाळीला लिलावात ११०० ते १२०० रुपये असा बाजारभाव मिळत आहे.
पावसामुळे उभे पीक नाश पावल्याने तसेच शेतात पावसाचे पाणी साचल्याने शेतकऱ्यांना तयार पिकाचा खुडा करणेही अवघड झाल्याने शेतकऱ्यांनी पिकाकडे दुर्लक्ष केले आहे. आगामी कालावधीत पावसाने दमदारपणे हजेरी लावल्यास सध्या शिल्लक असलेला शेतातील टमाटा नाश पावण्याची शक्यता आहे.