मार्केट बंदमुळे टोमॅटो, भोपळे फेकले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:13 AM2021-05-16T04:13:41+5:302021-05-16T04:13:41+5:30
येवला/पाटोदा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर करून जिल्ह्यातील सर्व बाजार समिती बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे लिलावासाठी बाजार ...
येवला/पाटोदा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर करून जिल्ह्यातील सर्व बाजार समिती बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे लिलावासाठी बाजार बंद असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. माल विक्रीची कोणतीही सोय नसल्याने येवला तालुक्यातील पाटोदा येथील शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत संताप व्यक्त केला. नांदूर शिवारातील शेतकऱ्याला पिकविलेला भोपळा फेकून देण्याची वेळ आली आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिके नष्ट होऊन शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले होते. यातून ते कसेबसे सावरत नाही तोच, कोरोनामुळे गेल्या चार दिवसांपासून बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडले आहेत. सध्या काकडी, दोडका, गिलका, भोपळा शेतमालाचा हंगाम असल्याने शेतात फळभाज्या तयार झालेल्या आहेत, परंतु मोठ्या प्रमाणावर आलेला हा माल दोन, चार किलो विक्री करणे शेतकऱ्याला शक्य नाही. शिवाय दिवसभर शहरात विक्रीसाठी बसून राहणे देखील परवडणारे नाही. अशातच बाजार समितीत भाजीपाल्याचे लिलाव बंद असल्याने तेथेही विक्री करता येत नाही. तयार फळभाज्यांचा वेळेत खुडा झाला नाही तर फळभाज्यांचा आकार वाढून त्या खराब होतात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फळभाज्या शेतात खुडून टाकाव्या लागत आहेत. तर काही शेतकरी आपल्या जनावरांना खाण्यासाठी फळभाज्या टाकत आहेत.
--------------------
शेत मशागतीची कामे सुरू
खरीप हंगाम तोंडावर आला आहे त्यामुळे शेतकरी वर्गाने भर उन्हात खरीप पूर्व शेतमशागतीची कामे सुरू केली आहेत.सध्या शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. नांगरणी,शेतातील ढेकळ फोडणे,जमीन सपाटीकरण करणे आशा शेतकामात शेतकरी वर्ग व्यस्त झाला आहे;मात्र गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर गगनाला भिडल्याने शेत मशागत महागल्याने शेतकरी वर्गाला आर्थिक फटका बसत आहे. या भागातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची कास धरत आपली प्रगती केली आहे.बैलांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली असून सर्वच शेतकरी शेतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत.
------------
निसर्गाच्या लहरीपणामुळे संकट
शेतकरी वर्ग नेहमीच निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडत आहे.त्यात मागील वर्षांपासून कोरोना महामारीची भर पडली आहे.संकट कमी होण्याऐवजी गडद होत असल्याने शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागत आहे.त्यामुळे शेतकरी वर्गाला अडचणीचा सामना करावा लागत आहे.खरीप हंगाम दहा पंधरा दिवसांवर आला आहे. बाजार समित्या व बाजारपेठ बंद असल्याने शेतात उत्पादित भाजीपाला व शेतमाल विक्री अभावी शेतात पडून आहे. उत्पादित केलेला माल विकता येत नसल्याने खरीप हंगामासाठी भांडवल कसे उभे करायचे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. भाजीपाला बांधावर फेकून देण्याची वेळ आली आहे.
-------------
इंधनाचे दर गगनाला भिडल्याने शेतमशागत महागली आहे,ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामे करणे अवघड झाले आहे.इंधन दरवाढीमुळे आर्थिक गणित बिघडले आहे.ट्रॅक्टर मालकांनीही मशागतीच्या दरात मोठी वाढ केली आहे.त्यामुळे आर्थिक फटका बसत आहे.
-ज्ञानेश्वर बोरनारे, शेतकरी, पाटोदा (१५ भोपळा)
===Photopath===
150521\15nsk_9_15052021_13.jpg
===Caption===
१५ भोपळा