टमाट्याची लाली फिकी, चार ते पाच किलोने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:16 AM2021-08-22T04:16:49+5:302021-08-22T04:16:49+5:30
जळगाव नेऊर : सध्या मिळत असलेल्या बाजारभावातून टमाटा लागवडीचा खर्चदेखील वसूल होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मागील वर्षाच्या ...
जळगाव नेऊर : सध्या मिळत असलेल्या बाजारभावातून टमाटा लागवडीचा खर्चदेखील वसूल होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टमाटा लागवड केली, त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करून पीक उभे केले. मागील वर्षी कोरोना साथीमुळे शेतकऱ्यांनी टमाटा लागवडीकडे पाठ फिरवली. पर्यायाने कोरोनाला न घाबरता ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली त्या शेतकऱ्यांच्या पदरात मात्र चार पैसे पडले. त्यामुळे यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टमाटा रोपे बुक करून लागवड केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी येतील का, बाजार समित्यात टमाटा घेतील का. मजूर मिळतील का, हे भविष्य अंधारमय असताना शेतकऱ्यांनी लागवड करून जुगार खेळून पाहिला; पण सरासरी २० किलोच्या क्रेटला ८० ते शंभर रुपये दर मिळणाऱ्या दरातून शेतकऱ्याचा खर्चदेखील वसूल होत नाही. बळीराजाने मात्र लागवडीतून खेळलेला जुगारात अपयश आले आहे.
-------------------
टमाट्याचे क्षेत्र वाढले
मागील वर्षी शेतकऱ्यांना टमाट्यातून बऱ्यापैकी पैसे झाल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात लागवडीत वाढ झाली असून आता मिळत असलेला ८० ते ९० रुपये क्रेटचा भाव यातून मात्र खर्चदेखील वसूल होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टमाटा पिकासाठी खर्च केला आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च वाढला असून, मल्चिंग पेपर, तार, बांबू मशागत, मजुरी, रासायनिक खते, लिक्विड औषधे या खर्चात वाढ झाली. यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळाल्याने मोठ्या प्रमाणात मजुरांची टंचाई भासत असून, त्यांनीही मजुरीत वाढ केली आहे.
------------
मी दोन एकरावर टमाट्याची लागवड केली असून, आतापर्यंत दोन एकरासाठी तार, बांबू, रासायनिक खते, लिक्विड खते, ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर मिळून दोन लाखांच्या आसपास खर्च आलेला आहे; पण आता पीक चालू झाले असताना त्याला मात्र ८० ते ९० रुपये २० किलोच्या क्रेटला भाव मिळत असल्याने यातून खर्चदेखील वसूल होणार नाही.
- शरद तिपायले, जळगाव नेऊर
फोटो ..जळगाव नेऊर येथे टमाटा भरताना शेतकरी कुटुंब. (२१ जळगाव नेऊर टोमॅटो)
210821\21nsk_13_21082021_13.jpg
२१ जळगाव नेऊर टोमॅटो