शेतकऱ्यांसाठी अवजार बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 09:19 PM2020-12-25T21:19:26+5:302020-12-26T00:36:54+5:30
नाशिक : अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती करणे दिवसेंदिवस जिकिरीचे ठरत आहे. त्यातच शेतीसाठी लागणा-या अत्याधुनिक शेती औजारांच्या किमती खूप जास्त असल्याने शेतक-यांच्या गटाने औजार बँक तयार केल्यास त्याद्वारे शेतक-यांची औजारांची गरज पूर्ण होऊ शकते. हे लक्षात घेऊन प्रगती अभियानने पुढाकार घेतला आहे. या संकल्पनेला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्याापीठाने सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असून, नुकतीच अस्वली हर्ष येथील शेतक-यांना बैलचलित औजारे देण्यासाठी चाचपणी केली.
या नव्या औजार बँकेसाठी बैलचलित औजारांचा सांभाळ आणि नीगा राखण्याची जबाबदारी प्रगती अभियान संस्थेच्या नागली विकास कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या शेतकरी गटास देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मराठवाडा कृषी विद्यापीठातील प्रमुख संशोधक डॉ. स्मिता सोलंकी आणि अजय वाघमारे तसेच प्रगती अभियान संस्थेचे एल. बी. जाधव. योगेश केंगे आणि रमणी यांनी अस्वली हर्ष येथील आदिवासी शेतक-यांची भेट घेतली तसेच तेथील पीक औजारे, कृषी प्रक्रिया याविषयी माहिती घेतली. नंतर डॉ. सोलंकी यांनी शेतक-यांना सुधारित औजारांविषयी मार्गदर्शन केले. या योजनेंतर्गत शेतक-यांना देण्यात येणा-या औजारांविषयी माहिती दिली.