अभ्यासक्रमात ‘जीएसटी’ विषय?
By admin | Published: July 13, 2017 12:04 AM2017-07-13T00:04:42+5:302017-07-13T00:52:52+5:30
चाचपणी : यूजीसी करणार तज्ज्ञांशी चर्चा; वाणिज्य शाखेत समावेश
संदीप भालेराव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : देशात एकच कर प्रणाली असावी यासाठी जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर या करप्रणालीविषयी सर्वसामान्यांमध्येच नव्हे तर अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञांमध्ये संभ्रमावस्था आहे. देशाने जीएसटी स्वीकारल्यानंतर त्यामध्ये साक्षरता यावी, यासाठी आता वाणिज्य अभ्यासक्रमातच जीएसटी विषय समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते. यासाठी यूजीसी या क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच काही विद्यापीठांशी चर्चा करणार आहे.
राज्य आणि देशाच्या आर्थिक विकासात आणि व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने जीएसटी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. जीएसटी हा देशाचा एक महत्त्वाचा निर्णय असल्याने आणि सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर सर्वत्र जीएसटी लागू झाला आहे. काळानुरूप जशी परिस्थिती समोर येईल त्याप्रमाणे जीएसटी प्रणालीतदेखील घडामोडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यामध्ये साक्षरता वाढावी आणि देशातील जनतेला विश्वास वाटावा यासाठी केंद्राच्या मदतीने अभ्यासक्रमात जीएसटी विषय समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे.
विशेषत: वाणिज्य शाखेत कंपन्या, व्यवसाय आणि त्या अनुषंगाने कराराचा अभ्यास विद्यार्थ्यांना पाच समेस्टर मध्ये शिकविला जातो. त्यातील एका सेमिस्टरमध्ये आता जीएसटी याविषयावर अभ्यासक्रम का असू नये, असा निर्णय दिल्ली विश्वविद्यालयाने घेतल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगानेदेखील याबाबत चाचपणी सुरू केली आहे. यासंदर्भात प्राथमिक पातळीवर निव्वळ चर्चा सुरू असून, प्रत्यक्षात हा अभ्यासक्रम कधी लागू होऊ शकेल याबाबतची कोणतीही स्पष्टता नाही; मात्र भविष्यात सदर विषय अभ्यासक्रमात नक्की येऊ शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. कर प्रणालीत शिकविणार धडाअभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या कर प्रणालीच्या अभ्यासक्रमात आता हा विषय येऊ शकतो; मात्र हा विषय ऐच्छिक असेल की सक्तीचा हे अद्याप निश्चित नाही. कला शाखेतही ऐच्छिक विषय म्हणून जीएसटी समाविष्ट करण्याबाबतचीही चर्चा झाल्याचे समजते.