दिंडोरी तालुक्यात तुफान पर्जन्यवृष्टी
By Admin | Published: September 20, 2015 10:21 PM2015-09-20T22:21:49+5:302015-09-20T22:22:30+5:30
शेतात पाणी : मोऱ्या गेल्या वाहून; धरणाच्या साठ्यात वाढ; वडाळीभोईत पूर; ठिकठिकाणी जलपूूजन
दिंडोरी : तालुक्यात शुक्रवारी २४ तासात सरासरी १४१ मिमी पाऊस वणीमध्ये रेकॉर्ड ब्रेक १९७ मिमी धरणे ५0 टक्के भरले एक दिवसात ३0 टक्के पाणीसाठा वाढला
दिंडोरी : या तालुक्यात शुक्र वारी पहाटेपासून झालेल्या सर्वाधिक पाऊस वणी परिसरात १९७ मिमी तर सर्वात कमी उमराळे परिसरात ११२ मिमी झाला असून, सरासरी १४१ मिमी पाऊस झाला असून, २० टक्क्यांच्या आत असलेल्या धरणातील पाणीसाठा तब्बल तीस टक्क्यांनी वाढत ५० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. दिंडोरी तालुक्यात धरण पाणलोट क्षेत्रात काहीसा कमी पाऊस झाल्याने धरणात अपेक्षित वाढ झाली नसली तरी सरसरी निम्मा पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे
कोरडेढाक असलेले तिसगाव धरण एकाच दिवसात ४० टक्के पाणीसाठा झाला आहे. दिंडोरी तालुक्यात सरसरीच्या अवघे ४९ टक्के पाऊस पडल्याने धरणसाठा अवघे १९ टक्के होता त्यामुळे सिंचनासाठी निर्बंध घालण्यात आल्याने द्राक्ष उत्पादक यांच्या तोंडचे पाणी पळाले होते, मात्र शुक्रवारी पहाटेपासून झालेल्या २४ तासात जोरदार पाऊस झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निवळण्याची परिस्थितीने शेतकरी सुखावला आहे
तालुक्यातील प्रमुख कादवा उनंदा कोलवण धामण बाणगंगा पाराशरी आदि सर्व नद्या सायंकाळनंतर दुधडी भरून वाहिल्या असून, मध्यरात्री पावसाने विश्रांती घेतली.
वडाळीभोई नदीला महापूर
वडाळीभोई : चांदवड तालुक्यातील वडाळीभोई परिसरात परतीच्या मुसळधार पावसाने चांगलेच थैमान घातले. यामुळे बळीराजा सुखावला आहे, तर काल झालेल्या पावसाने विनता नदीला महापूर आला, तर वडाळीभोई हे गाव विनता नदी तीरावर वसलेले आहे. गणपतीबाप्पाचे आगमन व त्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने दुष्काळी परिस्थितीवर मात होणार आहे. पावसामुळे शेतकऱ्यांबरोबर गणपती बाप्पाच्या भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. गेल्या पाच व सहा वर्षात पहिलाच पूर आल्याने सर्वत्र आंनदी वातावरण आहे.
या पावसाने केद्राई धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. त्यामुळे या धरणावर वडाळीभोई, खडकमाळेगाव, जोपूळ, खडकओझर आदि गावांच्या पिण्याचा पाणीप्रश्न सुटणार आहे. विनता नदीला आलेल्या पुरामुळे सरपंच निवृत्ती घाटे, राजाबाबा अहेर, राजकुमार जाधव आदिंसह ग्रामस्थांनी जलपूजन केले.
वडनेरभैरवला पाऊस
वडनेरभैरव : चांदवड तालुक्यातील वडनेभैरव परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली तर काल रात्रीपासून मुसळधार पावसाने सारा परिसर जलमय झाला होता. वडनेरभैरव गावात मेनरोडला पाणी घुसल्याने ग्रामस्थांची चांगलीच ताराबंळ उडाली होती. तर काही दुकानांमध्ये पाणी शिरल्याने लोकांना पाणी काढताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
तसेच वडनेभैरव ते वडाळीभोई रस्ता पूर्णत: जलमय झाल्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. तसेच वडनेभैरव व शिरवाडे जनार्दन स्वामी आश्रमाजवळदेखील रस्त्यावर मोठ्या ्रप्रमाणात पाणी वाहत असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या.
पिंपळनारे परिसरातदेखील पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्व परिसर जलमय झाला व गावातील पीठगिरणी, विद्युत डी.पी. व गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाणीच पाणी साचले होते.
शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेतून घरी जाताना पाण्यातून रस्ता शोधून घरी जावे लागले. सर्व गणेश मंडळांना आपले शेड सांभाळताना पावसात काम करावे लागले. (वार्ताहर)