तामसवाडीमध्ये जेरबंद झालेला बिबट्या संरक्षित जंगलात मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 03:26 PM2018-09-15T15:26:35+5:302018-09-15T15:27:46+5:30
नाशिक: निफाड तालुक्यातील तामसवाडी शिवारात ऊसात वाढलेला बिबट्या सोमवारी (दि.१०) मध्यरात्रीच्या सुमारास पिंजऱ्यात जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. मंगळवारी सकाळी वनविभाग पश्चिमच्या कर्मचा-यांनी शहरातील पशुवैद्यकिय दवाखान्यात वैद्यकिय तपासणी करुन मायक्रो चिप बिबट्याला बसविली. मध्यरात्री संरक्षित जंगल म्हणून घोषित असलेल्या अभयारण्यात बिबट्याला सुरक्षितरित्या मुक्त करण्यात आले.
वनविभाग पुर्वच्या हद्दीमध्ये ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या हद्दीतील दिंडोरी, निफाड, सिन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढत आहे. बिबट-मानव संघर्ष कमी करण्यासाठी वनविभाग पूर्वकडून सातत्याने विविध प्रयत्न केले जात आहे; मात्र या प्रयत्नांना अद्याप पाहिजे तसे यश मिळताना दिसत नाही. पंधरवड्यापुर्वीच दिंडोरी तालुक्यात बिबट्याच्या दिड वर्षाच्या पिल्लाने एका अडीच वर्षाच्या बाळाचा बळी घेतल्याची घटना परमोरी गावाच्या शिवारात घडली होती. या घटनेनंतर वनविभाग पूर्व खडबडून जागे झाले असून सुमारे ५०हून अधिक वनकर्मचारी या शिवारात तळ ठोकून बिबट्याला जेरबंद करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. तसेच निफाड तालुक्यातदेखील विविध गावांमध्ये बिबट्यांचा संचार कायम असून सोमवारी तामसवाडी शिवारात बिबट्या जेरबंद करण्यास यश आले होते. हा बिबट्या निफाडमध्येच वाढल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले; कारण बिबट्याला कु ठल्याहीप्रकारची मायक्रो चिप यापुर्वी लावली गेल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे हा बिबट्या पहिल्यांदाच वनविभागाच्या पिंज-यात कैद झाल्याचेही निष्पन्न झाले. संपुर्ण वाढ झालेला प्रौढ बिबट्याची तपासणी पशु वैद्यकिय अधिकारी संजय महाजन यांनी अशोकस्तंभ येथील रुग्णालयात केली. त्यानंतर या बिबट्याला शेपूटच्या भागात मायक्रो चिप यशस्वीरित्या बसविण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक डॉ. शिवाबाला एस. यांनी दिली.
मायक्रो चिप बसविल्यामुळे या बिबट्याची भविष्यात ओळख पटविण्यासाठी उपयोग होणार आहे. ऊसात वाढलेला बिबट्या संरक्षित जंगलाच्या क्षेत्रात सोडण्यात आला असला तरी भविष्यात हा बिबट्या पुन्हा मानवी वस्तीकडे फिरकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाजनपूरला पुन्हा बिबट्या जेरबंद
निफाड तालुक्यातील सायखेडा-भेंडाळी रस्त्यावरील महाजनपूर शिवारात दराडे यांच्या शेतीवर लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद झाला. नर जातीचा सुमारे ५ वर्षे वयाचा बिबट्या पिंज-यात अडकल्याची माहिती सुत्रांनी दिली. आॅगस्ट महिन्यामध्ये या शिवारात तीन बिबटे जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले होते. संपुर्ण गोदाकाठ परिसरात बिबट्याचा वावर अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.