शहरात पावसाचा जोर ; दिवसभर मध्यम सरींचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 01:28 AM2019-07-30T01:28:48+5:302019-07-30T01:29:04+5:30
शहर व परिसरात पावसाचा पहाटेपासून जोर कायम होता. दिवसभर मध्यम सरींचा वर्षाव सुरूच असल्याने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात १५.८ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली. रविवारच्या तुलनेत सोमवारी (दि.२९) शहरात पावसाचा जोर अधिक राहिला.
नाशिक :शहर व परिसरात पावसाचा पहाटेपासून जोर कायम होता. दिवसभर मध्यम सरींचा वर्षाव सुरूच असल्याने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात १५.८ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली. रविवारच्या तुलनेत सोमवारी (दि.२९) शहरात पावसाचा जोर अधिक राहिला.
गुरुवारपासून शहर व परिसरात पावसाला सुरुवात झाली असून, गुरुवारी १५.४ मिमीपर्यंत पाऊस पडला होता. मात्र शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला होता, मात्र शनिवारी पुन्हा पावसाने जोर धरल्याने दिवसभरात १५.६ मिमीपर्यंत पाऊ स पडला होता. रविवारी त्या तुलनेत पाऊस कमी झाला. सोमवारी पुन्हा पहाटेपासून पावसाचा दुपारपर्यंत जोर वाढल्याने ८.६ मिमीपर्यंत पाऊस दुपारपर्यंत नोंदविला गेला. दुपारी तीन वाजेपासून पुढील अडीच तासांत चांगला पाऊस झाला. सायंकाळी साडेपाचपर्यंत १५.८ मिमीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून
करण्यात आली. हंगामात अद्याप ५४१.३ मिमीपर्यंत पाऊस शहरात नोंदविला गेला आहे. जून महिन्यात पावसाची स्थिती समाधानकारक नव्हती, मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस नोंदविला गेला. गेल्यावर्षी २७ जुलैपर्यंत ४३० मिमीपर्यंत पाऊस पडला होता. यावर्षी जुलै महिन्यात १०० मिमीने पावसाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.
सोमवारी पहाटेपासून सकाळी १० वाजेपर्यंत मध्यम सरी दमदार कोसळत होत्या. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी कार्यालयांमध्ये पोहोचणाऱ्या चाकरमान्यांसह शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हाल झाले.