वन्यजीवांचा जातोय बळी! शेकरूसह कधी कासव तर कधी घोरपडीच्या अवयवांचा सौदा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 09:36 AM2022-02-09T09:36:53+5:302022-02-09T09:42:45+5:30
अझहर शेख नाशिक : राज्यप्राणी शेकरू असो किंवा बिबट्या असो अथवा मग अंधश्रद्धेपोटी कासव, घोरपड, साळिंदरसारखे वन्यजीव असो इतकेच ...
अझहर शेख
नाशिक : राज्यप्राणी शेकरू असो किंवा बिबट्या असो अथवा मग अंधश्रद्धेपोटी कासव, घोरपड, साळिंदरसारखे वन्यजीव असो इतकेच नाही तर सागरी जीवांचाही सौदा नाशिकसारख्या शहरात होऊ लागल्याने वन-वन्यजीव विभागापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. कधी अंधश्रद्धेपोटी तर कधी ‘एक्झोस्टिक’च्या हौसेपोटी वन्यजीवांची अन् त्यांच्या अवयवांचीही बाजारात बोली लावली जात आहे.
भौगोलिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या नाशिकच्या आजूबाजूला वन्यजीवांची जैवविविधता चांगली आहे. मात्र, या जैवविविधतेवर तस्करांकडून वक्रदृष्टी केली जाऊ लागल्याने धोका निर्माण होत आहे. यामुळे नाशिककर वन्यजीवप्रेमींसह वन विभागाची जबाबदारी वाढली आहे. इगतपुरीजवळ चक्क बिबट्याच्या कातडीचा सौदा आटोपून रकमेची होणारी देवाणघेवाण शहापूर वन विभागाच्या सतर्कतेमुळे टळली. या गुन्ह्यात १४ संशयितांना वन पथकाने बेड्या ठोकल्या. ११ संशयित हे इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आहे. यावरून नाशिकमध्ये बिबट्याच्या कातडीचाही व्यवहार करण्याचे धाडस खुलेआम केले जात असल्याच्या चर्चेला बळ मिळते. सागरी वन्यजीवांसह काही वन्यपक्षी व सरपटणाऱ्या घोरपडीसारख्या वन्यप्राण्यांचाही जीव धोक्यात येऊ लागला आहे. यामुळे पश्चिम वन विभागाच्या भूमिकेकडे नाशिककर वन्यजीवप्रेमींचे लक्ष लागले आहे.
अंधश्रद्धेतून मागणीला जोर; जनजागृतीचा अभाव
साळिंदरच्या शरीरावरील काटे, रानडुकराचे दात, घोरपडीचे लिंग, पंजे, समुद्री कंकाळ (सी-फॅन), सागरी प्राण्यांच्या सांगाड्याचे काटेरी प्रवाळ (ब्लॅक कोरल), मोरांचे पंख तसेच मांडूळ सर्प, घुबड यांचीही शिकार अंधश्रद्धेपोटी होऊ लागली आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पंचवटीतील पूजा साहित्य विक्रीच्या दुकानांपैकी काही विक्रेत्यांकडे वारंवार अशाप्रकारच्या वन्यजीवांच्या अवयव आढळून येत आहेत.
तस्करीच्या दृष्टीने नाशिक हॉटस्पॉट
वन्यजीवांसह त्यांच्या अवयवांच्या तस्करीच्या दृष्टीने नाशिक आता हॉटस्पॉट बनू लागले आहे. नाशिकमधून अन्य जिल्ह्यांतसुद्धा अशाप्रकारे मालाचा पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक खुलासा कोल्हापूरच्या विशेष वन पथकाच्या कारवाईमधून झाला आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासारख्या जिल्ह्यांमधील तस्करीचे नाशिकचे कनेक्शन उघडकीस आले आहे.