चारवर्षीय चिमुरडीवर अत्याचार
By admin | Published: May 12, 2017 02:16 AM2017-05-12T02:16:43+5:302017-05-12T02:16:59+5:30
नाशिकरोड : महिलेच्या चार वर्षांच्या मुलीवर कारखाना मालकानेच क्रूरपणे अत्याचार केल्याची संतापजनक घटना बुधवारी सायंकाळी घडली
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : सिन्नर फाटा येथील फरसाण कारखान्यात कामाला असलेल्या महिलेच्या चार वर्षांच्या मुलीवर कारखाना मालकानेच क्रूरपणे अत्याचार केल्याची संतापजनक घटना बुधवारी सायंकाळी घडली. पीडीत बालिकेस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून नराधमावर कठोर करावाई करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सिन्नर फाटा ओढारोड येथील वृंदावन अपार्टमेंटमध्ये राहणारा सुभाष प्रकाशचंद झंवर (५१) याचा नेहे मळ्यात फरसाण बनविण्याचा कारखाना आहे. झंवर याच्या फरसाणच्या कारखान्यात नेहे मळ्यातील एक महिला कामाला असून, झंवर याने बुधवारी सायंकाळी सदरील महिलेस कामावर बोलावून घेतले होते. महिला कारखान्यावर आली असता संशयित झंवर तिला काम सांगून कारखान्याबाहेर पडला आणि सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास महिलेच्या घरी जाऊन तिच्या चार वर्षांच्या मुलीला आइस्क्रीम खाऊ घालण्याचा बहाणा करून आपल्या सोबत घरी घेऊन गेला. तेथे नराधमाने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने बालिकेला तिच्या आईकडे सोडले. तेव्हापासून रडणारी चिमुरडी घरी गेल्यानंतर चक्कर येऊन पडली. तेव्हा तिच्या शरीरावर अनेक जखमा असल्याची बाब तिच्या आईच्या लक्षात आली.
घटनेनंतर कुटुंबीयांनी बालिकेला घेऊन झंवर यास जाब विचारला असता त्याने घाईत असल्याचे कारण सांगून तो तेथून निघून गेला. त्यानंतर बालिकेच्या कुटुंबियांनी तिला बिटको रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तिच्या अंगावर ठिकठिकाणी चावा घेतल्याच्या खुणा तसेच अतिप्रसंग करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सदर निंदनीय प्रकार नेहे मळ्यातील रहिवाशांना समजताच त्यांनी बिटको रुग्णालयात धाव घेतली.
दरम्यान, इतका वेळ पीडित बालिकेच्या कुटुंबियांसमवेतच रुग्णालयात आलेल्या झवर याने बिटको रुग्णालयातून पलायन करण्याचा प्रयत्न केला. सदर बाब जमलेल्यांच्या लक्षात आल्यानंतर नराधम झंवर यास संतप्त नागरिकांनी बिटको चौकात गाठून बेदम चोप दिला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयितास ताब्यात घेतले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अतिप्रसंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित सुभाष झवर हा मारहाणीत जखमी झाल्याने त्यास बिटको रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.