कांद्यापाठोपाठ लसूणच्या चवेलाही ठसका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 08:04 PM2019-12-23T20:04:12+5:302019-12-23T20:06:37+5:30
बाजार समितीत लसूणला कमीत कमी शंभर ते एकशे वीस रुपये किलो असा होलसेल बाजारभाव मिळत आहे. किरकोळ बाजारात लसूण खरेदी करणा-या ग्राहकांना लसूणच्या चार कांड्या म्हणजे शंभर ग्रॅम खरेदीसाठी किमान २० ते २५ रुपये
नाशिक : रोजच्या जेवणात भाजीची चव वाढविणाऱ्या कांद्याबरोबरच आता लसूणची चवही नकोशी झाल्याची परिस्थिती निर्माण झाली असून, नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्य प्रदेशातून येणा-या लसूणची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने दर गगनाला भिडले आहेत. मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात साध्या लसूणचे किलोचे दर दोनशे तर गावठी लसूणचा भाव तीनशे रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
बाजार समितीत लसूणला कमीत कमी शंभर ते एकशे वीस रुपये किलो असा होलसेल बाजारभाव मिळत आहे. किरकोळ बाजारात लसूण खरेदी करणाºया ग्राहकांना लसूणच्या चार कांड्या म्हणजे शंभर ग्रॅम खरेदीसाठी किमान २० ते २५ रुपये लागत असल्याने ग्राहक हवालदिल झाले आहेत. तीन-चार वर्षांपूर्वी लसूणची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने बाजारभाव घसरले होते. गेल्यावर्षी लसूणला ५ ते १५ रुपये किलो बाजारभाव मिळत होता. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने लसूण उत्पादकांनी लागवड कमी केली. परिणामी यावर्षी उत्पादन घटल्याने लसूण बाजारभावाने उच्चांक गाठला आहे. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्य प्रदेशातील इंदूर, मनसोर व नीमच भागातून मोठ्या प्रमाणात लसूण विक्रीसाठी दाखल होत असतो. मध्य प्रदेशात लसूणची मोठी लागवड केली जाते. यंदा भरपूर पाऊस झाल्याने खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे, परंतु अजून नवा लसूण बाजारात विक्रीसाठी दाखल झालेला नाही. लसूणचे बाजार गगनाला भिडल्याने नाशिक बाजार समितीत आठवड्यातून एखाद-दुसरी चारचाकी भरून लसूण मालाची आवक होत आहे.