पर्यटनपूरक व्यवसायाला अर्थसहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:26 AM2017-09-28T00:26:03+5:302017-09-28T00:26:09+5:30
सुशिक्षित बेरोजगार असलेल्या तरुणांना पर्यटन व्यवसायात रोजगाराला वाव आहे. ट्रॅव्हल्स व्यवसाय हा पर्यटनाला पूरक असा असून, या व्यवसायासाठी सरकारच्या वतीने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून इच्छुकांना अर्थसहाय्यही उपलब्ध असल्याचे प्रतिपादन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुनील काचे यांनी केले.
नाशिक : सुशिक्षित बेरोजगार असलेल्या तरुणांना पर्यटन व्यवसायात रोजगाराला वाव आहे. ट्रॅव्हल्स व्यवसाय हा पर्यटनाला पूरक असा असून, या व्यवसायासाठी सरकारच्या वतीने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून इच्छुकांना अर्थसहाय्यही उपलब्ध असल्याचे प्रतिपादन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुनील काचे यांनी केले.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन आॅफ नाशिक व ईजी सोल्युशन अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यटन : विकास व संधी’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (दि.२७) मखमलाबाद रस्त्यावरील ग्रीन लॅन्ड रिसॉर्ट येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पाहुणे म्हणून व्यासपीठावर पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे, महाराष्टÑ कौशल्य व उद्योजकता विकास संचलनालयाचे उपसंचालक सुनील सैंदाणे, सारंगखेड्याचे सरपंच जयपाल रावल उपस्थित होते. यावेळी काचे म्हणाले, राज्य शासनाच्या विविध महामंडळांच्या माध्यमातून गरजू प्रशिक्षणार्थ्यांना तसेच व्यवसाय इच्छेुकांना शासकीय क र्ज सुविधा उपलब्ध आहेत. याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, कर्ज प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले. लाभार्थ्यांना ५० हजारापासून तर पाच लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते. याकरिता प्रकल्प अहवाल, व्यावसायिकता, प्रामाणिकपणा, जिद्द-चिकाटी आदिंची गरज असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मुंडावरे यांनी राज्य पर्यटन महामंडळाकडून राज्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. ‘तान’चे दत्ता भालेराव यांनी ‘नाशिक : कृषी पर्यटनाच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना पर्यटन अभ्यासक्रम, व्यक्तिमत्त्व विकास, संभाषण कौशल्य, पर्यटनाचे धडे देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरुणाईला योग्य दिशा दाखविल्यास बेरोजगारीला आळा बसेल, असे प्रशिक्षक सागर धर्माधिकारी यांनी सांगितले. जयेश तळेगावकर यांनी वाइन पर्यटन याविषयी माहिती दिली.
पर्यटनमित्रांचा गौरव
पर्यटनवृद्धीसाठी प्रयत्न करून योगदान देणाºया पर्यटनमित्रांचा गौरव महाराष्टÑ राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) वतीने करण्यात आला. यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन पर्यटनमित्रांना गौरविण्यात आले. यावेळी पर्यटन क्षेत्रात सिनिक, वाइन, टुरिझम, टेंट, डॅम, आर्ट, फूड, धार्मिक आदी पर्यटनाच्या माध्यमातून प्रयत्नशील असणाºया व्यक्ती व संस्थांची निवड करण्यात आली होती. यावेळी रॅम विजेते सायकलपटू डॉ. महेंद्र महाजन, डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. रमाकांत पाटील, डॉ. राजेंद्र नेहेते, मनोज वासवानी, सागर वाघचौरे, विनायक पाटील, संजय खताळे, विजयालक्ष्मी शंकर आदिंना गौरविण्यात आले.
मोफत पर्यटन प्रशिक्षण
कौशल्य भारत विकास अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मागील महिन्यापासून शहरातील रविवार कारंजा येथे सदर अकादमीत मोफत पर्यटन प्रशिक्षण दिले जात आहे. एकूण तीस विद्यार्थी येथे प्रशिक्षण घेत असून पुढील बॅचसाठी नाव नोंदणीही सुरू आहे. किमान बारावी उत्तीर्ण असलेल्या समाजातील सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रशिक्षणासाठी वयोमर्यादेची अट नसून कालावधी सहा महिन्यांचा आहे.