सुरगाण्यातील भिवतास धबधब्याचे पर्यटकांना आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 10:19 PM2020-08-17T22:19:16+5:302020-08-18T01:10:08+5:30
दिंडोरी : दाट वनराई, हिरवाईने नटलेला परिसर त्यात कोसळणारा पाऊस अन् धुक्याची चादर असे नयनरम्य दृश्य सध्या दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागात दिसत आहे.
दिंडोरी : दाट वनराई, हिरवाईने नटलेला परिसर त्यात कोसळणारा पाऊस अन् धुक्याची चादर असे नयनरम्य दृश्य सध्या दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागात दिसत आहे. पेठ-सुरगाणा तालुक्यातील डोंगरदऱ्या पर्यटकांना आकर्षित करत आहेत. सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधबा पर्यटकांना भुरळ घालत आहे. स्वातंत्र्यदिन व रविवारची सुट्टी या दोन्हीं दिवशी शेकडो पर्यटकांनी भिवतास येथे भेट देत पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटला. दिंडोरी तालुक्यातील गोळशी, ननाशी, भनवड, मांजरपडा, देवसाने परिसरात घाटमाथ्यावर धुक्याची झालर पसरली असून, या भागात पर्यटक मोठी गर्र्दी करत आहेत. ननाशीपासून पश्चिमेला ३० किलोमीटरवरील बाºहे गावाजवळ केळवण येथे नार नदीवर भिवतास धबधबा असून, पर्यटक गर्र्दी करत आहेत. जिल्ह्यासह गुजरातमधूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत आहेत. परिसरातील नदी, नाले, घाटरस्ते छोटे-छोटे धबधबे प्रवाहित झाल्याने पर्यटकांना आकर्षित करत आहेत. स्वातंत्र्यदिनी मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी येथे गर्दी केली होती. पर्यटकांनी फोटो काढत मनमुराद आनंद लुटला.