पांडवलेणी चढताना पर्यटक कोसळला; मुंबईतून मुलीसह फिरण्यासाठी आले असता दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 03:45 PM2022-08-21T15:45:11+5:302022-08-21T15:47:14+5:30
मुंबई येथून नाशिकला पर्यटनासाठी आपल्या मुलीसोबत आलेला ४० वर्षीय पर्यटक पाय घसरून पांडवलेणी येथून कोसळला.
नाशिक: मुंबई येथून नाशिकला पर्यटनासाठी आपल्या मुलीसोबत आलेला ४० वर्षीय पर्यटक पाय घसरून पांडवलेणी येथून कोसळला. घटनेची माहिती मिळताच गिर्यारोहकांसह इंदिरानगर पोलिसांनी धाव घेत पर्यटकाला रेस्क्यू करत पायथ्याला आणले. तातडीने रुग्णवाहिकेतून त्यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत बापलेक जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई येथील रहिवासी साबियो सांचेस (४०, रा. मुंबई) हे त्यांच्या एका लहान मुलीला घेऊन शनिवारी (दि.२०) सकाळी पांडवलेणीला फिरण्यासाठी आले होते. पांडवलेणी चढत असताना अचानकपणे सांचेस यांचा पाय घसरला व ते खाली कोसळले. यामुळे त्यांच्या हातात असलेली लहान चिमुकलीही पडली. ही घटना सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. यामुळे बापलेक जखमी झाले. सांचेस यांनी त्वरित याबाबत मुंबईत असलेल्या त्यांच्या नातेवाइकांना कळविले.
नातेवाइकांनी महाराष्ट्र माऊटेनिअर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरचे राहुल मेश्राम यांच्याशी संपर्क साधला. मेश्राम यांनी त्वरित नाशिक क्लाईम्बर्स ॲन्ड रेस्क्यूअर्स असोसिएशनला कळविले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने स्थानिक गिर्यारोहकाचा पहिला चमू घटनास्थळी पोहचला. तेथील जखमी व्यक्तीची परिस्थिती बघता स्पाईन बोर्ड मागविण्यात आला. व्यक्तीच्या कमरेला मार असल्याने स्पाईन बोर्ड, रोप बांधून सुरक्षितपणे खाली पायथ्याशी आणण्यात आले. तेथून १०८च्या रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले.
अडीच तास रेस्क्यू ऑपरेशन
दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले. यावेळी घटनास्थळी इंदिरानगरचे पोलीस रविराज भांगरे, निवृत्ती माळी, बिट मार्शल संदीप लांडे व भावराव गवळी यांच्यासह गिर्यारोहक नीलेश पवार, ओम उगले, अभिजित वाघचौरे, ऋषिकेश वाघचौरे, अजय पाटील, आदित्य फाळके, चंद्रकांत कुंभार, मुकुल वांद्रे आदींच्या पथकाने ही बचाव मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. या बचाव मोहिमेसाठी सुमारे अडीच तासांचा कालावधी लागला.