साल्हेर किल्ल्यावर पाय घसरून पर्यटकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 02:00 AM2022-07-16T02:00:03+5:302022-07-16T02:00:30+5:30
बागलाण तालुक्यातील पर्यटनस्थळ असलेल्या साल्हेर किल्ल्यावर शुक्रवारी (दि.१५) मालेगावहून पर्यटनासाठी आलेल्या आठ ते दहा तरुणांपैकी भावेश शेखर अहिरे व मनीष सुनील मुटेकर हे दोघे किल्ल्यावरून पाय घसरून दरीमध्ये कोसळले. या दुर्घटनेत भावेश शेखर अहिरे (२१), रा. मालेगाव याचा जागीच मृत्यू झाला, तर मनीष सुनील मुटेकर (२१) हा गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला.
सटाणा : बागलाण तालुक्यातील पर्यटनस्थळ असलेल्या साल्हेर किल्ल्यावर शुक्रवारी (दि.१५) मालेगावहून पर्यटनासाठी आलेल्या आठ ते दहा तरुणांपैकी भावेश शेखर अहिरे व मनीष सुनील मुटेकर हे दोघे किल्ल्यावरून पाय घसरून दरीमध्ये कोसळले. या दुर्घटनेत भावेश शेखर अहिरे (२१), रा. मालेगाव याचा जागीच मृत्यू झाला, तर मनीष सुनील मुटेकर (२१) हा गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला.
या दुर्घटनेची माहिती समजताच घटनास्थळी मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, जायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, पोलीस हवालदार तुकाराम जगताप, रवी भामरे, पोलीस कॉन्स्टेबल जितू पवार तसेच माजी कृषिमंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे पोहोचले व त्यांनी मदतकार्यास सुरुवात केली. तत्पूर्वी शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास साल्हेर किल्ल्यावर पर्यटनासाठी मालेगावचे १२ तरुण किल्ल्यावर पोहोचले होते. त्यावेळी भावेश शेखर अहिरे याचा पाय घसरून खाली पडत असताना त्याला पकडण्यासाठी मनीष मुटेकर गेला असता दोघेही खाली पडले. भावेश हा खोल दरीत जाऊन कोसळला तर मनीष झाडामध्ये अडकून राहिला. त्यामुळे मनीष गंभीररीत्या जखमी झाला, तर भावेश अहिरे दरीत कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मधुकर भोये यांनी जायखेडा पोलीस स्टेशनला दिली. भास्कर बच्छाव, मधुकर भोये यांनी तात्काळ गावातील तरुण तुळशीराम मोरे, विजय बहिरम, अशोक भोये, अंबादास मोरे, पंकज भामरे यांना पाचारण करत तरुणाची शोधाशोध सुरू केली दरीमध्ये पडलेल्या भावेश अहिरे या तरुणाचा मृतदेह वर काढण्यात आला.
खांडवींनी जखमीला आणले पाठगुळी
जखमी असलेला मनीष मुटेकर याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले तेव्हा त्यास किल्ल्यावरून खाली कसे न्यायचे, हा प्रश्न निर्माण झाला. मधुकर भोये यांनी सोबत आणलेले डॅशिंग किट व कापडी टेक्चर त्या ठिकाणी कामात आले. टेक्चरवर मयत भावेश अहिरे यांना ठेवून कसरतीने खाली उतरवण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी जखमी अवस्थेत असलेला मनीष याला खांद्यावर घेऊन खाली आणले.