पर्यटकांना ८० लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 01:11 AM2020-02-14T01:11:48+5:302020-02-14T01:13:01+5:30
श्रीलंकेला पर्यटनासाठी नेण्याचे आमिष दाखवून एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या महिला संचालकाने शहरातील १३ पर्यटकांना सुमारे ८० लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दातार ट्रॅव्हल्स अॅण्ड कन्सलटन्सी प्रा. लि. टुर कंपनीच्या लेखा कुलकर्णी ऊर्फ लेखा निनाद शहा यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गंगापूर : श्रीलंकेला पर्यटनासाठी नेण्याचे आमिष दाखवून एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या महिला संचालकाने शहरातील १३ पर्यटकांना सुमारे ८० लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दातार ट्रॅव्हल्स अॅण्ड कन्सलटन्सी प्रा. लि. टुर कंपनीच्या लेखा कुलकर्णी ऊर्फ लेखा निनाद शहा यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गंगापूररोडजवळील गणेशनगर परिसरातील रहिवासी संजीत दिलीप बेझलवार (३२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना ३१ डिसेंबरनिमित्त सहकुटुंब परदेशात सहलीसाठी जायचे होते. त्यानुसार त्यांनी श्रीलंकेत जाण्यासाठी चौकशी केली व आॅनलाइन तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून तिकीट बुक न झाल्याने मित्राने सांगितल्याप्रमाणे त्यांनी डिसूजा कॉलनीतील दातार ट्रॅव्हल्स कंपनीसोबत संपर्क साधला. कंपनीच्या संचालक लेखा यांनी २७ डिसेंबर ते ३ जानेवारी श्रीलंका येथे नेण्याचे आश्वासन दिले. तसेच आॅनलाइन तिकीट बुक करून देऊ, असेही सांगितले. त्यासाठी संजीत यांच्यासह त्यांच्या नातलगांचे तिकीट काढण्यासाठी लेखा हिने ६ लाख २४ हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार संजीत यांनी आॅनलाइन पद्धतीने ट्रॅव्हल्स कंपनीच्या बँक खात्यात पैसे वर्ग केले. त्यानंतर संजीत यांनी पाठपुरावा केला असता लेखा हिने त्यांना विमानाचे तिकीट दिले नाही किंवा इतर कोणतेही कागदपत्रे दिली नाहीत. १९ डिसेंबरला संजीत यांनी कार्यालयात गेले असता कार्यालय बंद आढळले. त्यामुळे लेखा हिने १३ पर्यटकांना सहलीला नेण्याचे आमिष दाखवून ७९ लाख ५० हजार १०० रु पयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गंंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.