पर्यटकांची नेहरू वनोद्यानालाही पसंती
By admin | Published: May 14, 2015 12:10 AM2015-05-14T00:10:47+5:302015-05-14T00:16:36+5:30
पर्यटकांची नेहरू वनोद्यानालाही पसंती
नाशिक : तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहराची वाटचाल विकासाच्या नव्या पर्वात मंत्रभूमीकडून तंत्रभूमीकडे जरी होत असली तरी मूळच्या दंडकारण्याच्या गौरवशाली हिरवाईचा वारसा आजही जतन केल्याचा अनुभव वनविभागाच्या नेहरू वनोद्यानाच्या भेटीत नाशिककरांना येत आहे. उन्हाळी सुटीमुळे सध्या हे उद्यान विविध कुटुंबांच्या वनसहलींनी गजबजून जात आहे.वीस हेक्टर जागेवर वनविभागाने त्रिरश्मी डोंगराच्या पायथ्याशी १९८५ साली पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यान विकसित केले. हे उद्यान केवळ बगीचा आहे असे नाही, तर मानवाला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाणारे व निसर्गप्रेम वाढविणारे उत्तम ठिकाण आहे. आजच्या धावपळीच्या युगामध्ये नैसर्गिक विसावा दुर्मीळ होत चालला आहे. मनाला शांती देणारे आल्हाददायक वातावरण असलेले शहरापासून जवळचे एकमेव निसर्गरम्य ठिकाण म्हणजे नेहरू वनोद्यान आहे. या उद्यानाला दिवसेंदीवस नाशिककरांसह आजूबाजूच्या शहरांमधील निसर्गप्रेमी नागरिकांचीही मोठी पसंती मिळू लागली आहे. त्याचप्रमाणे वनविभागाकडून सातत्याने वनोद्यानाच्या विकासासाठी केले जाणारे नावीन्यपूर्ण प्रयोग येथे येणाऱ्या नागरिकांना अधिकच आवडत आहे. उद्यानातील वृक्षराजीच्या गर्द सावलीत तयार केलेल्या पायवाटांवरून वनभ्रमंती करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने सहकुटुंब उद्यानात हजेरी लावतात. उद्यानात येणाऱ्या प्रत्येक अभ्यांगत, पर्यटक, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहली, पर्यावरणप्रेमींची येथील वनपाल कार्यालयात नोंद केली जाते. तसेच उद्यानाच्या सुरक्षिततेसाठी व मूळ नैसर्गिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी वनविभागाकडून सातत्याने विविध सूचनांचे पालन करण्याचे आवाहन उद्यानभेटीसाठी आलेल्या निसर्गप्रेमींना केले जाते. नागरिकदेखील स्वयंस्फूर्तीने सूचनांचे पालन करत स्वयंशिस्तीने वनभ्रमंती, वनभोजनाचा आनंद घेत ‘रिफ्रेश’ होऊन घरी जातात.
बालगोपाळांना वनउद्यानांची भेट कंटाळवाणी वाटू नये, म्हणून वनविभागाच्या वतीने या ठिकाणी खेळण्यादेखील बसविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे सर्व खेळण्या सुस्थितीत टिकून आहे. कारण अन्य उद्यानांप्रमाणे हे वनोद्यान रामभरोसे नसून वनरक्षक, वनपाल, वनमजुरांच्या यांच्या निगराणीखाली आहे. नाशिककरांबरोबरच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठीदेखील भर उन्हाळ्यात ‘कुल विकेंड’ साजरा करण्याचे उत्तम ‘डेस्टिनेशन’ म्हणून हे वनोद्यान नावारूपाला आले आहे. (प्रतिनिधी)