नाशिकला पर्यटकांचा वाढेल मुक्काम; रखडलेला ‘कलाग्राम’प्रकल्प लवकरच येणार सेवेत
By अझहर शेख | Published: July 11, 2023 01:57 PM2023-07-11T13:57:46+5:302023-07-11T13:58:09+5:30
केंद्र सरकारच्या योजनेतून ‘कलाग्राम’ संकल्पना पुढे आली होती.
नाशिक : आगामी कुंभमेळा डोळ्यांसमोर ठेवून राज्याच्या पर्यटन संचालनालयासह पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) नाशिकच्या पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या गोवर्धन शिवारातील ‘कलाग्राम’च्या प्रकल्पातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन पर्यटकांना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या सहा महिन्यांत हा प्रकल्प पूर्णत्वास येईल, असा आशावाद एमटीडीसीकडून व्यक्त करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या योजनेतून ‘कलाग्राम’ संकल्पना पुढे आली होती. गोवर्धनमध्ये सुमारे २एकर क्षेत्रात होणाऱ्या या प्रकल्पाला मागील सहा ते सात वर्षांपासून घरघर लागली होती. दिल्लीच्या ‘हाट बाजार’च्या धर्तीवर या प्रकल्पाचे बांधकाम केले गेले; मात्र अंतिम टप्प्यात येऊन निधीअभावी रखडले होते. २०१४साली बांधकामाला प्रारंभ करण्यात आला होता. केंद्राचा निधी संपल्यानंतर राज्याकडून निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला जात होता; मात्र यश येत नव्हते. अखेर राज्याने पर्यटन सांस्कृतिक मंत्रालयाने उर्वरित कामासाठी निधीचा पुरवठा केला असून निविदाही काढण्यात आली आहे. लवकरच या प्रकल्पाच्या उर्वरित कामाचा आदेश काढण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांनी सांगितले. केंद्राने चार कोटी तर राज्याने उर्वरित दोन कोटी असा सुमारे सहा कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पावर करण्यात येत आहे.
सर्व काही एकाच छताखाली...
जिल्ह्यातील कलाकारांना व महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादित वस्तूंची विक्रीसाठी हे हक्काचे केंद्र राहणार आहे. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधील खाद्यसंस्कृती प्रसिद्ध असून वस्तू, कलाकुसरीचे दर्शन तसेच आदिवासी तालुक्यांमधील हस्तकलेलाही स्थान याठिकाणी दिले जाणार आहे. यामुळे एकाच छताखाली खूप काही पर्यटकांना बघता येणार आहे.
साहसी पर्यटनालाही चालना
नाशिक जिल्हा हा गडकिल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सह्याद्री, अजंठा-सातमाळा पर्वतरांगा लाभलेल्या या जिल्ह्यात विविध गिरिदुर्ग आहेत. या गड-किल्ल्यांना मोठा इतिहास असून याठिकाणी दुर्गप्रेमींची नेहमीच रेलचेल असते. साहसी पर्यटनाला यामुळे वाव असून त्यास चालना मिळावी, यासाठी नाशिकच्या अंजनेरी येथे पर्यटन संचालनालयाकडून साहसी क्रीडा प्रशिक्षण केंद्र उभारले जात आहे. पुढील चार महिन्यांमध्ये हे केंद्र सुरू होईल, असा आशावाद पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड यांनी व्यक्त केला.