टंचाईसदृश परिस्थितीवर महिनाअखेर उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:31 AM2018-10-06T00:31:41+5:302018-10-06T00:32:05+5:30
नाशिकसह राज्यातील १७० तालुक्यांमध्ये यंदा कमी पर्जन्यवृष्टी झाली असून, टंचाईग्रस्त तालुक्यांचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या ३१ आॅक्टोबर अखेर पीक कापणी प्रयोग राबवून टंचाईग्रस्त परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नाशिक : नाशिकसह राज्यातील १७० तालुक्यांमध्ये यंदा कमी पर्जन्यवृष्टी झाली असून, टंचाईग्रस्त तालुक्यांचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या ३१ आॅक्टोबर अखेर पीक कापणी प्रयोग राबवून टंचाईग्रस्त परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नाशिक जिल्ह्णाचे विकास प्रकल्प व योजनांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील कमी पर्जन्यमान झालेल्या तालुक्यांना मदतीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्यात ७७ टक्के पर्जन्यमान झाले असले तरी, त्याबाबतची परिस्थिती प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे. काही ठिकाणी कमी पाऊस पडूनही पिकांची परिस्थिती चांगली आहे तर काही ठिकाणी पाऊस अधिक पडूनही जलसाठा कमी
झाला आहे. त्यामुळे तूर्त टंचाईची परिस्थिती दिसू लागली असून, याचा वेगवेगळ्या पातळीवरून आढावा घेतला जात आहे. आवश्यकता भासेल तेथे राज्य सरकार टंचाईचा सामना करण्यासाठी मदत करेल, असे त्यांनी जाहीर केले.
केंद्राचे पथक येणार
कमी पर्जन्यमान झालेले १७० तालुके दुष्काळसदृश व टंचाईग्रस्त घोषित करण्यासाठी ३१ आॅक्टोबर अखेर अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्राचे पथक राज्यात येऊन पाहणी करेल व दुष्काळी परिस्थितीबाबत आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेणार अहे.