नगररचना विभाग : वास्तुविशारदांनाच मिळणार अधिकार २०० चौ.मी.च्या बांधकाम आराखडा मंजुरीत सुलभता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:30 AM2017-12-17T01:30:20+5:302017-12-17T01:31:09+5:30
शहरातील २०० चौरसमीटर अर्थात दोन हजार चौरस फुटांपर्यंतच्या इमारत बांधकाम आराखड्यास मान्यताप्राप्त वास्तुविशारदांच्या स्तरावरच मंजुरी मिळणार असून, त्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागात चकरा मारण्याची गरज भासणार नाही.
नाशिक : शहरातील २०० चौरसमीटर अर्थात दोन हजार चौरस फुटांपर्यंतच्या इमारत बांधकाम आराखड्यास मान्यताप्राप्त वास्तुविशारदांच्या स्तरावरच मंजुरी मिळणार असून, त्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागात चकरा मारण्याची गरज भासणार नाही. याबाबतची अधिसूचना पुढील सप्ताहात निर्गमित केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
महापालिकेने इमारत बांधकाम परवानग्यांसाठी नगररचना विभागात आॅटो डीसीआर प्रणाली कार्यान्वित केलेली आहे. आतापर्यंत दाखल ५०० प्रकरणांपैकी १०७ प्रकरणे निकाली निघू शकली आहेत. परंतु, या आॅटो डीसीआर प्रणालीतील त्रुटींबाबत दी इन्स्टिट्यूशन आॅफ आर्किटेक्ट्सच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष प्रदीप काळे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. आॅनलाइन प्रक्रिया सुरू असली तरी आॅफलाइन पद्धतीने कागदपत्रांची मागणी केली जात असल्याची तक्रार यावेळी वास्तुविशारदांनी केली. याशिवाय, नगररचना विभागात स्वतंत्र छाननी केंद्र उभारण्याची आणि वास्तुविशारदांना आॅटो डीसीआर प्रणालीचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, आॅटो डीसीआर प्रणालीत सुलभता आणण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी समितीही नियुक्त करण्यात आलेली आहे. शासनाच्या निर्णयानुसार, यापुढे २०० चौ.मी.पर्यंतच्या बांधकामाच्या आराखडा परवानगीसाठी नगररचना विभागात येण्याची गरज भासणार नाही. मान्यताप्राप्त वास्तुविशारदांमार्फतच सदर परवानगी घेता येईल. असे आराखडे मंजूर करण्याचे अधिकार वास्तुविशारदांना देण्यात येणार आहेत. त्याबाबतचा आदेश लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे. त्यामुळे नगररचना विभागावर पडणारा ताणही कमी होण्यास मदत होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.