बेशिस्त वाहनचालकांना बसणार ‘टोइंग’चा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:20 AM2021-02-17T04:20:33+5:302021-02-17T04:20:33+5:30
बेशिस्त पद्धतीने शहरात विविध ठिकाणी तसेच ‘नो पार्किंग’मध्ये वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत बेशिस्त पद्धतीने वाहने टोइंग ...
बेशिस्त पद्धतीने शहरात विविध ठिकाणी तसेच ‘नो पार्किंग’मध्ये वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत बेशिस्त पद्धतीने वाहने टोइंग करून ओढून नेली जात होती; मात्र ही कारवाई अनेकविध कारणांमुळे नाशिककरांसह पोलीस प्रशासनाच्याही नाकीनऊ आणणारी ठरली. दुचाकी उचलून टेम्पोत भरणाऱ्या ‘हेल्पर’ मंडळींमुळे वाहनचालक आणि त्यांच्यात सातत्याने भर रस्त्यावर खटके उडू लागले आणि नागरिकांकडून तक्रारींचा पाऊस पाडला गेला. चारचाकी टोइंग करताना काळजीपूर्वक पद्धतीने हायड्रोलिक वाहनाचा वापर संबंधितांकडून केला जात होता; मात्र दुचाकींबाबत केवळ ‘उचल अन टाक’ अशीच भूमिका ठेकेदाराच्या मजुरांनी घेतल्याने सर्वसामान्यांचा अधिक संताप होत होता. हा सगळा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी ‘तजवीज’ करत नाशिक शहर पोलिसांकडून सर्वोतोपरी खबरदारी घेऊन नव्याने टोइंग प्रक्रिया राबवून वाहन पार्किंगच्या बेशिस्तीला चाप लावण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी सांगितले.
---इन्फो--
शहरात ठिकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा
बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरात ठिकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होऊ लागल्याने शहर वाहतूक शाखेकडे तक्रारी वाढल्या आहे. सर्वाधिक तक्रारी बड्या लोकांनी त्यांच्या मोटारी चुकीच्या पद्धतीने निष्काळजीपणे उभ्या केल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत येऊ लागल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला, नो पार्किंग झोनमध्ये सर्रास चारचाकी वाहने उभी केल्या जात आहेत. अशा बेशिस्त चालकांवर कारवाई करण्यासाठी पुन्हा टोइंग कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. ऑगस्ट महिन्यात तांत्रिक लिफाफा उघडल्यानंतर निविदापूर्व बैठक झाली. त्यानंतर आता वित्तीय लिफाफा उघडला जाणार असून त्यानंतर टोइंगचा मार्ग खुला होईल.