महाराष्ट चेंबर-मलेशिया असोसिएशनमध्ये व्यापार करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:22 AM2019-08-28T00:22:21+5:302019-08-28T00:22:48+5:30
महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स आणि मलेशिया होलसेलर्स असोसिएशन यांच्यात व्यापारउद्योग संबंध वाढविणे व तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करण्यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला.
सातपूर : महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स आणि मलेशिया होलसेलर्स असोसिएशन यांच्यात व्यापारउद्योग संबंध वाढविणे व तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करण्यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व मलेशिया असोसिएशनचे अध्यक्ष डेटो-लिम सेंग कोक यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
आयमा सभागृहात महाराष्ट्र चेंबर आणि आयमा यांच्या संयुक्त विद्यमाने मलेशियामधील व्यवसाय संधींविषयी परिसंवाद आणि बी टू बी बैठक घेण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर कॉन्सुलेट जनरल आॅफ मलेशियाचे कौन्सुल जनरल झाइनल अझलन नादझीर, मलेशिया होलसेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष डेटो-लिम सेंग कोक, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, अनिलकुमार लोढा, आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, धनंजय बेळे, ललित बूब, जगदीश पाटील उपस्थित होते. यावेळी मंडलेचा यांनी सांगितले की, भारतातील निर्यात वाढावी आणि त्याद्वारे आर्थिक विकास व्हावा यासाठी विविध देशांच्या वकिलातीत संपर्क करून त्या त्या देशातील व्यापारी, उद्योजकांच्या भेटी आयोजित करत आहोत. महाराष्ट्र चेंबरचे प्रतिनिधीचे शिष्टमंडळ मलेशिया दौºयावर जाऊन आले त्याचाच भाग म्हणून मलेशियाचे शिष्टमंडळ नाशिकला आले आहे. मलेशिया असोसिएशनचे अध्यक्ष डेटो-लिम सेंग कोक यांनी सांगितले की, मलेशिया आणि भारत दोन्ही देशांतील व्यापारउद्योग वाढावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मलेशियामध्ये अन्न व पेयपदार्थ, पॅक फूड, गिफ्ट, स्मृतिचिन्हे, हस्तशिल्प, फॅशन अॅक्सेसरीज, होम डेकोर व किचनवेअर, हलाल उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, पीसी व मोबाइल अॅक्सेसरीज, संगणक, तयार कपडे व वस्त्र, फॅशन आणि क्रिएटिव्ह उत्पादने आदी क्षेत्रात मलेशियात व्यापार उद्योगांसाठी मोठ्या संधी आहे त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कॉन्सुलेट जनरल आॅफ मलेशियाचे कौन्सुल जनरल झाइनल अझलन नादझीर यांनीही भारत व मलेशियातील व्यापारी संबंध अधिक दृढ होण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न होत असल्याचे सांगितले. यावेळी सुनीता फाल्गुने, भावेश मानेक, स्वप्नील जैन, सोनल दगडे, मिथिला कापडणीस, चिराग फाल्गुने, राजेंद्र वडनेरे, मिलिंद राजपूत, उन्मेष कुलकर्णी, राजेंद्र आहिरे, एस. एस. भोगल, दिलीप वाघ, योगीता आहेर, एन. टी. गाजरे, अविनाश मराठे, राजेंद्र कोठावदे आदींसह कार्यकारिणी सदस्य व व्यापारी, उद्योजक उपस्थित होते.