व्यापार, व्यापारी वाचविण्यासाठी दुकाने सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:11 AM2021-05-31T04:11:48+5:302021-05-31T04:11:48+5:30
नाशिक : शहरातील कोरोनाचे संकट वाढल्याने प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकमधील सर्व व्यापारी संस्था आणि संघटनांनी शासननिर्णयाचे ...
नाशिक : शहरातील कोरोनाचे संकट वाढल्याने प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकमधील सर्व व्यापारी संस्था आणि संघटनांनी शासननिर्णयाचे पालन करीत शहरातील दुकाने पूर्णपणे बंद ठेवून कोरोना नियंत्रणाच्या मोहिमेला पाठिंबा दिला; परंतु आता कोरोनाची रुग्णसंख्या घटली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याने शहरातील व्यापार आणि व्यापारी वाचविण्यासाठी १ जूनपासून दुकाने सुरू करण्याची मागणी कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सतर्फे (कॅट) करण्यात आली आहे.
नाशिक शहरातील सर्वसामान्य व्यापाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांची दुकाने पूर्णपणे बंद ठेवली असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. व्यावसायिकांना रोजच्या खर्चासह दुकान भाडे, विमा पॉलिसी, कर्ज हफ्ते, कामगारांचे पगार वीज बिल, बँकांचे व्याज आणि शासनाचे विविध कर हे रोजच्या रोज होणाऱ्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून भागवावे लागतात. मात्र, सध्याच्या स्पर्धेच्या युगात एकीकडे ऑनलाइन पद्धतीने होणारा व्यापार आणि दुसरीकडे मागील काही महिने चाललेले लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान यातून व्यावसायिकांना धंदा करणे अवघड झाल्याचे नमूद करीत दुकाने पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.
इन्फो-
वीज बिल, बँकेच्या व्याजात सवलतीची मागणी
मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये केंद्र शासनाकडून काही बाबतीत सूट दिली होती. या लॉकडाऊनमध्ये तसे कुठलेही पॅकेज शासनाने जाहीर केलेले नसल्याचे नमूद करीत व्यापाऱ्यांनी वीज बिलात चार महिने सूट मिळावी, बँकेच्या व्याजावर माफी मिळावी, दुकानाच्या भाड्यामध्ये सूट मिळावी, खेळते भांडवलासाठी बँकांना निर्देश द्यावे, तसेच जीएसटीत माफी, कामगारांचे पगार यासाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी कॅटच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विमा पॉलिसीला मुदत वाढ मिळावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
कोट-
कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने १ जूनपासून सर्व दुकाने कमीत कमी दहा तास तरी दुकाने चालू ठेवणे आवश्यक आहे. कोरोनासंबंधी सर्व दिलेल्या मार्गदर्शक सूचना यांचा व्यापारी निश्चितच अवलंब करतील.
- संजय सोनवणे, उपाध्यक्ष, कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स