तिहेरी अपघातात व्यापाऱ्याचा चिरडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 07:09 PM2020-12-18T19:09:29+5:302020-12-19T01:00:55+5:30
चांदवड : येथील पेट्रोलपंप चौफुलीवर शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास फिरायला गेलेले व्यापारी सुनील माधवराव व्यवहारे (६२) यांचा तिहेरी अपघातात लक्झरी बसच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला.
शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास चांदवड पेट्रोलपंप चौफुलीवर लखनऊ येथून नाशिककडे लक्झरी बस (क्र. जी जे १४ एक्स ४१०१) जात असताना एच.पी. गॅस टाक्या भरलेला ट्रक (क्र. एमएच १२ सीटी ३७६७) लासलगावकडून मालेगाव रावळगावकडे वळण घेत असताना अचानक दोन्ही वाहनांची धडक झाली. यात लक्झरी बस रस्त्याच्या बाजूला उलटली. यात मॉर्निंग वॉकसाठी गेलेले शहरातील व्यापारी सुनील माधवराव व्यवहारे (६२) बसखाली दबून जागीच ठार झाले. लक्झरी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेली ओम्नी काळी पिवळी कारवर (क्र. एमएच १५ ई २१६०) उलटल्याने कार व शेजारील पानटपरी चक्काचूर झाली. सुदैवाने कारमध्ये व पान दुकानात कोणी नव्हते. घटनेची माहिती मिळताच चांदवड सोमा टोल कंपनीचे गस्ती पथकाचे कर्मचारी अंबादास बिरारी, शशिकांत पवार, राहुल ठाकरे, ज्ञानेश्वर ढोमसे, मयूर सोनवणो, प्रतीक अहिरे, समाधान शिंदे, नंदू पारवे दाखल झाले. त्यांनी व्यवहारे यांचा मृतदेह चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. अपघातात दोन्ही वाहनांतील कोणीही जखमी झाले नाही. चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हरिश्चंद्र पालवी, अमित सानप अधिक तपास करीत आहेत. अपघातातील मृत सुनील व्यवहारे हे चांदवड येथील कांदा व्यापारी माधवराव धोंडू व्यवहारे यांचे चिरंजीव असून, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सून, आई, वडील, भाऊ, बहिणी, नातवंडे असा परिवार आहे.