व्यापाऱ्याचे अपहरण करून पावणेदोन लाख लंपास
By admin | Published: May 28, 2017 12:02 AM2017-05-28T00:02:58+5:302017-05-28T00:03:13+5:30
ंमालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथील किराणा व्यापाऱ्याची कार अडवून लाखोची रोकड हिसकावून पलायन करणाऱ्या चार अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ंमालेगाव : तालुक्यातील रावळगाव येथील किराणा व्यापाऱ्याची कार अडवून त्यास गंभीर मारहाण करीत लाखोची रोकड व भ्रमणध्वनी हिसकावून त्यास मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी गावाच्या शिवारात फेकून देऊन पलायन करणाऱ्या चार अज्ञात भामट्यांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी प्रसाद दिलीप अग्रवाल (२८) या व्यापाऱ्याने फिर्याद दिली आहे. दाभाडी-पिंपळगाव मार्गावर हा प्रकार घडला. अग्रवाल यांचे मनमाड चौफुलीवर किराणा व पशुखाद्य विक्रीचे दुकान आहे. दुकान बंद करून ते कारमधून (क्र. एमएच ४१ व्ही ६१२१) दाभाडी रोडने रावळगावकडे जात होते. दाभाडी शिवारात तवेरा गाडीतून आलेल्या ३० ते ३५ वयोगटातील अज्ञात चौघा इसमांनी त्यांची गाडी अडवून त्यांना गंभीर मारहाण केली. त्यांच्याजवळील एक लाख ६८ हजारांची रोकड व भ्रमणध्वनी असा एक लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. त्यानंतर त्यांना गाडीत कोंबून महामार्गावरील आर्वी गावाच्या शिवारात फेकून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.