सप्तशृंगी गडावरील व्यावसायिकांना पॅकेजची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:21+5:302021-06-11T04:11:21+5:30

गडावर वर्षभरात दोन यात्रोत्सव व दर्शनासाठी येणाऱ्या देवीच्या भाविकांमुळे अनेकांच्या हाताला येथे काम मिळते. फुले, प्रसाद, खण-नारळ विक्रेता, ...

Traders at Saptashrungi fort waiting for the package | सप्तशृंगी गडावरील व्यावसायिकांना पॅकेजची प्रतीक्षा

सप्तशृंगी गडावरील व्यावसायिकांना पॅकेजची प्रतीक्षा

Next

गडावर वर्षभरात दोन यात्रोत्सव व दर्शनासाठी येणाऱ्या देवीच्या भाविकांमुळे अनेकांच्या हाताला येथे काम मिळते. फुले, प्रसाद, खण-नारळ विक्रेता, पार्किंग, हॉटेल व्यवसाय करणाऱ्या अनेकांसाठी सप्तशृंग गड म्हणजे पोटापाण्याची सोय आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू झाला आणि गडावरील व्यावसायिकांचे जगणेच 'लॉक' झाले आहे.

आता परिस्थिती निवळत चालल्याने भाविक, पर्यटकांसाठी देवीदर्शन खुले करावे, नियमांचे पालन करीत गडावर दर्शन सुविधा सुरू करावी, अशी मागणी सप्तशृंगी गडावरील स्थानिक व्यावसायिक, नागरिक व भाविक यांनी केली असून, ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. स्थानिक नागरिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला असून, त्यांना हाताला मिळेल ते काम करण्यासाठी बाहेरगावी जावे लागत आहे. यापूर्वीही कोरोनाच्या पहिल्या लाटेत आठ महिने मंदिर बंद होते. चैत्रोत्सव व नवरात्रौत्सव हे उत्सव कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून शासनाने रद्द केले होते. आता दुसऱ्या लाटेतही मंदिर बंद आहे. हातावर पोट असणाऱ्या राज्यातील ठराविक व्यावसायिकांना शासनाने पॅकेज दिले आहे. मात्र, देवस्थान ठिकाणी कोणतीही मदत केलेली नाही. त्यामुळे शासनाने तीर्थस्थळावरील व्यावसायिकांना पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी होत आहे.

कोट....

सप्तशृंगी गडावर स्थानिक नागरिकांना उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्याने उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. नाशिक, मुंबई व इतर ठिकाणच्या भाविकांची मदत घेऊन किराणा साहित्याचे वाटप केले. शासनाने नियमावली व ऑनलाईन बुकिंग करून दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून नागरिकांची दुकाने सुरू होऊन रोजगार उपलब्ध होईल.

- राजेश गवळी, ग्रामपंचायत सदस्य

Web Title: Traders at Saptashrungi fort waiting for the package

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.