सभापतींसह व्यापाऱ्यांना मारहाण
By Admin | Published: August 4, 2016 01:05 AM2016-08-04T01:05:38+5:302016-08-04T01:06:01+5:30
लासलगावी कांदा आंदोलकांचा उद्रेक : आज लासलगाव बंद
लासलगाव : गोणीपद्धतीने कांदा लिलावाविरुद्धच्या आंदोलनाने बुधवारी लासलगावी वेगळे वळण घेतले असून, लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर आणि काही व्यापाऱ्यांना आंदोलकांनी मारहाण केल्याने बाजार समितीत काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे काहीकाळ लिलाव बंद झाले होते. निफाडचे पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे व लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर सायंकाळी लिलाव सुरू करण्यात आले. दरम्यान मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.४) लासलगाव बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कांदा आवारात बुधवारी सकाळी दहा वाजता सर्वपक्षीय नेत्यांसह श्ोतकऱ्यांनी गोणी पध्दतीच्या विरोधात आंदोलन करीत लिलाव होऊ न देण्याची भूमीका घेतली. या आंदोलनानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर आपल्या कार्यालयात व्यापारी वर्गाशी चर्चा करीत असतांना माजी सभापती नानासाहेब पाटील यांच्यासह काही शेतकऱ्यांसह कार्यालयात घुसले. या जमावाने अचानक आक्रमक पवित्रा घेत सभापती जयदत होळकर यांच्यावर काठीने तसेच लोखंडी पाईपने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बाजार समितीचे कर्मचारी दत्तात्रय होळकर यांनी बचाव केल्याने सभापती यांच्या टेबलवरील काच फुटली. जमावाने या ठिकाणी उपस्थित काही व्यापाऱ्यांनाही मारहाण केली.
लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे व उपनिरीक्षक दिपक आवारे यांच्यासह उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी शेतक-यांना पांगविले. यामुळे तीन ते सहा वाजेपर्यंत बाजार समिती आवारात तणावाचे वातावरण होते. मारहाणीमुळे व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी होण्यास नकार दिला . या नंतर तातडीने वाढीव पोलीस कुमक लासलगाव येथे दाखल
झाली. निफाडचे पोलीस उपअधीक्षक दिपक गिर्हे व लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे ,सभापती जयदत्त होळकर पंढरीनाथ थोरे , ललीत दरेकर , सचिन ब्रम्हेचा व व्यापारी यांची संयुक्त बैठक घेतली त्यास शेतकरी प्रतिनिधी म्हणून राजाराम दरेकर बाबासाहेब गुजर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. या सभेत सुमारे तासभर चर्चा झाल्यानंतर आलेल्या कांद्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला.यानंतर सभापती जयदत्त होळकर व संचालक पंढरीनाथ थोरे हे व्यापाऱ्यांसह दाखल झाले.व सकाळ पासून न झालेले लिलाव सुरू करण्यात आले.(वार्ताहर)