घोटी बाजार समितीकडे व्यापाऱ्यांनी फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 05:06 PM2021-04-11T17:06:56+5:302021-04-11T17:07:22+5:30
घोटी : भाजीपाला उत्पादनात अग्रेसर व तालुक्याच्या बहुतांश भागात बागायती पिके म्हणून टोमॅटोसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र ...
घोटी : भाजीपाला उत्पादनात अग्रेसर व तालुक्याच्या बहुतांश भागात बागायती पिके म्हणून टोमॅटोसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र विकेंड निर्बंधामुळे व ठिकठिकाणी सुरु असलेला जनता कर्फ्युमुळे भाजीपाला मार्केटमध्ये खरेदी विक्रीवर बंधने आली आहेत. मुंबईत विकेंड बंदमुळे बहूतांश व्यापारी बांधवांनी भाजीपाला खरेदीसाठी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे शेतकरी बांधवांचाही शेतमाल गेल्या दोन दिवसांपासून वावरातच पडून होता.
दरम्यान इगतपुरी तालुक्यात भाजीपाला पिकांची, टोमॅटो, वांगे यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने भाव मात्र कमालीचे घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादित शेतमाल वाहतूक खर्चाला जड झाल्याने अनेक बहुतांश शेतकऱ्यांनी खुडलेला शेतमाल बंधावरच फेकून देत हतबलता व्यक्त केली.
इगतपुरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला घोटी मार्केटच्या माध्यमातून मुंबईला निर्यात केला जातो. तर पूर्वेकडील बहुतांश शेतकरी आपला भाजीपाला नाशिक बाजार समितीत घेऊन जातात. त्यामुळे घोटी बाजार भाजीपाल्याची मोठी आवक वाढली आहे. मात्र विकेंडच्या निर्बंधामुळे मुंबई बंद असल्याने व्यापारी बांधव यांचे येणे दोन दिवस घोटी बाजारपेठेत येणे घटल्याने त्यातच मालाची आवकही वाढल्याने मालाचे भाव घसरले जात आहे तर मार्केटला व्यापारी कमी असल्याचे चित्र दिसल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खुडलेला भाजीपाला वावरातच वाहने भरून ठेवली असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.