जावई धिंडीची परंपरा यंदा खंडित होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:15 AM2021-04-01T04:15:08+5:302021-04-01T04:15:08+5:30

सिन्नर : धूलिवंदन ते रंगपंचमी या काळात वडांगळी येथे जावयांची गाढवावरून धिंड काढण्याची परंपरा आहे. त्यामुळे या काळात वडांगळीचे ...

The tradition of Jawai Dhindi is on the verge of breaking this year | जावई धिंडीची परंपरा यंदा खंडित होण्याच्या मार्गावर

जावई धिंडीची परंपरा यंदा खंडित होण्याच्या मार्गावर

Next

सिन्नर : धूलिवंदन ते रंगपंचमी या काळात वडांगळी येथे जावयांची गाढवावरून धिंड काढण्याची परंपरा आहे. त्यामुळे या काळात वडांगळीचे जावई सहजासहजी ग्रामस्थांच्या दृष्टीस पडत नाहीत. ग्रामस्थांच्या ताब्यात सापडून केव्हा धिंड निघेल, हे सांगता येणार नसल्याने या काळात जावई भूमिगत होत असतात. कोरोनामुळे सण-उत्सवांवर संक्रांत आली असून, यावर्षी कोरोनाच्या नियमामुळे जावयांची धिंड काढण्याची परंपरा खंडित होण्याची शक्यता आहे.

धूलिवंदन ते रंगपंचमी या काळात जावयांची गाढवावरून धिंड काढण्याची परंपरा जपण्यासाठी ग्रामस्थ दरवर्षी जावयांचा शोध घेत असतात. यंदा मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्याने धिंड निघणार नसल्याचे संकेत मिळाल्याने वडांगळीचे जावई निवांत आहेत. कोविडचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यामुळे ब्रिटिशकाळापासून चालत आलेली जावयांची गाढवावरून धिंड ही परंपरा यंदा खंडित होणार आहे. धिंड निघणार नसल्याने गावातील घरजावई, पंचक्रोशीत राहणारे जावई निवांत आहेत. जावई न मिळाल्यास वडांगळीत रुजू असलेल्या सरकारी नोकरदारांनाही जावई मानून धिंड काढली जाते. आता तेही बिनधास्त आहेत. विशेषत: युवकवर्ग तर सण असल्यासारखे वाटत नसल्याचे बोलून दाखवत आहेत. सणाचे दिवस असूनही धिंड निघणार नसल्याने निरुत्साह आहे, तर कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये, अशी इच्छाही अनेक जण व्यक्त करतात.

इन्फो...

अनोखी परंपरा...

जावयाला फाटके कपडे, डोक्याला सुपाचे बाशिंग, कांद्याच्या मुंडावळ्या व तुटक्या चपलांच्या माळा घालून गाढवावर बसवले जाते. वाजतगाजत गावातून धिंड निघते. यावेळी रंगांची यथेच्छ उधळण केली जाते. धिंडीचा सासऱ्याच्या घरासमोर समारोप होतो. जावयाला उटणे लावून अंघोळ घातली जाते. नवीन कपडे व पुरण-पोळीचे जेवण दिले जाते.

Web Title: The tradition of Jawai Dhindi is on the verge of breaking this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.