येवल्यातील गुजराथी समाजातील जया पार्वती व्रत परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 08:56 PM2020-07-10T20:56:54+5:302020-07-11T00:12:32+5:30
येवला : उत्तम जीवनसाथी मिळावा, यासाठी आजही शेकडो वर्षांची परंपरा कायम ठेवत येवल्यातील लेवा पाटीदार गुजराथी समाजातील कुमारिका जया पार्वती व्रत श्रद्धेने करत आहेत.
येवला : उत्तम जीवनसाथी मिळावा, यासाठी आजही शेकडो वर्षांची परंपरा कायम ठेवत येवल्यातील लेवा पाटीदार गुजराथी समाजातील कुमारिका जया पार्वती व्रत श्रद्धेने करत आहेत. आषाढ शुद्ध त्रयोदशीपासून सुरू झालेल्या या व्रताची सांगता पाच दिवसांच्या उपवासानंतर होते. पुराणात भगवान विष्णू यांनी माता लक्ष्मीला या व्रताबद्दल माहिती दिली असल्याचे सांगितले जाते. या व्रतात जया पार्वतीचे पूजन केले जाते. देशातील अनेक राज्यात पुत्रप्राप्ती, अखंड सौभाग्यप्राप्ती यासाठी हे व्रत केले जाते. मात्र, येवला येथील लेवा पाटीदार गुजराथी समाजातील कुमारिका उत्तम जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात. लेवा पाटीदार गुजराथी समाजात या व्रताच्या प्रारंभी पहाटे शिव-पार्वती देवतेला आवाहन करून त्यांची स्थापना केली जाते. पूजेत गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मूग या पाच धान्यांची रोपे असलेल्या दोन टोपल्या स्थापन केल्या जातात. त्याचे विधिवत पूजन करून अभिषेक केला जातो. नंतर हळद-कुंकू, अष्टगंध, अक्षता, फुले, फळे, सुकामेवा अर्पण करून धूप, दीप आणि नैवेद्य दाखवला जातो. यानंतर जया पार्वती व्रताच्या कथेचे वाचन केले जाते. आरती करून प्रसाद वाटला जातो. हे व्रत करताना सलग पाच दिवस कुमारिका कोणतेही एक धान्य तेही मीठ न टाकता दिवसातून एकच वेळा जेवण करतात. गरज भासल्यास इतर वेळी मात्र प्रसादातील फळे व सुकामेवा फराळ म्हणून दिला जातो.
आषाढ शुद्ध त्रयोदशी ते आषाढ कृष्ण तृतिया यादरम्यान हे व्रत केले जाते. कृष्ण तृतियेला या व्रताची सांगता होते. सांगतेप्रसंगी जाईजुई इतर फुलांच्या कळ्यांचा वापर करून सुंदर मुकुट तयार केला जातो. यावर मोर, हंस, पोपट, हत्ती, कमळाचे फूल अशा विविध सुंदर कलाकृती साकारल्या जातात. याबरोबरच वेणीस विशेष महत्त्व देऊन सजवले जाते. शिवाय गळ्यातील हार, मनगटी, बाजुबंद, कर्णफुले, कंमरपट्टा, पैंजण विशेष म्हणजे हा सर्व शृंगार फक्त फुलांच्या कळ्यांच्या वापर करून केला जातो. रेशमी वस्त्रासह विविध आभूषणांनी कुमारिकेस सजवले जाते. व्रताच्या सांगतेप्रसंगी ज्येष्ठांचे आशीर्वाद व भेट वस्तू देण्यात येतात. गोड नैवेद्य वाटून जया पार्वती व्रताची सांगता होते.