जलवाहिनीच्या कामामुळे वाहतुकीचा बोजवारा इंदिरानगर बोगदा : महामार्गासह समांतर रस्त्यावर वाहनांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 05:45 PM2021-01-02T17:45:44+5:302021-01-03T00:46:22+5:30
इंदिरानगर : इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक समोरील बोगद्या लगत महापालिकेच्या पाणीपुरवठाच्या वतीने जलवाहिनी जोडण्याचे काम गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असून, जलवाहिनीसाठी रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा खणण्यात आल्याने व काम अजुनही पुर्ण होत नसल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.
इंदिरानगर : इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक समोरील बोगद्या लगत महापालिकेच्या पाणीपुरवठाच्या वतीने जलवाहिनी जोडण्याचे काम गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असून, जलवाहिनीसाठी रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा खणण्यात आल्याने व काम अजुनही पुर्ण होत नसल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. या कामामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच इंदिरानगरकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागत आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विल्होळी ते आडगाव नाका यादरम्यान उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. तर शहरातील वाहतुकीसाठी मुख्य व समांतर रस्ते आहेत. इंदिरानगर परिसरातील नागरिकांना शहरात ये जा करण्यासाठी जॉगिंग ट्रॅक समोर उड्डाणपुलाखाली बोगदा करण्यात आला आहे. वाहनांची संख्या पाहता या ठिकाणी अगोदरच वाहतुकीची कोंडी होत असताना पंधरा दिवसापूर्वी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने जलवाहिनीचे काम करण्यासाठी बोगद्यात समोरील समांतर रस्ता व महामार्ग याच्या मधोमध सुमारे आठ फूट खड्डा खणण्यात आला आहे. परंतु अद्याप पर्यंत जलवाहिनीचे जोडण्याचे काम पूर्ण न करण्यात आल्याने इंदिरा नगरकडुन बोगदाकडे जाणारी वाहने, समांतररस्ता व महामार्ग कडून येणारी वाहनांची वाहतूक कोंडी होत आहे. प्रत्येकालाच पुढे जाण्याची घाई झाल्यामुळे लहान मोठे अपघातही होत असून, वाहतुकीची कोंडी फोडायला या ठिकाणी पोलीस देखील नेमलेले नाहीत.
रस्त्याची झाली चाळण
शहरातून समांतर रस्त्यावरून इंदिरानगर व साईनाथनगर चौफुलीकडे जाणारी वाहने सुचिता नगर मार्गे कॉलनी रस्त्यांने वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाढत्या वर्दळीने या रस्त्याचीही चाळण झाली असून, लहान-मोठे खड्ड्यांनी अपघात होत आहे. महापालिकेने त्वरीत या रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.