वाहतूक कोंडीची डोकेदुखी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 10:48 PM2020-01-20T22:48:24+5:302020-01-21T00:17:56+5:30
शहरातून जाणारा मनमाड-अहमदनगर राज्य महामार्गासह येथील विंचूर चौफुलीवर वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचाच झाल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन होत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
येवला : शहरातून जाणारा मनमाड-अहमदनगर राज्य महामार्गासह येथील विंचूर चौफुलीवर वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचाच झाल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन होत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
स्वच्छ शहर, सुंदर शहर, येवला शहर ही संकल्पना कागदावरच राहिली असून, वाहतूक कोंडीचे शहर म्हणून येवल्याची ओळख होऊ लागली आहे. येथील नगर-मनमाड रस्त्यावरील येवला-विंचूर चौफुलीसह फत्तेबुरुज नाका, गंगा दरवाजा भागात चौफुलीवर कायम वाहतूक कोंडी होत आहे, तर विंचूर चौफुली व फत्तेबुरुज नाका येथे सकाळी १० वाजल्यापासून वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. नगर व औरंगाबाद येथून नाशिकला जाणारी वाहने येवला-विंचूर चौफुलीवरील वाहतुकीच्या कोंडीत सापडत आहे. त्यातच शहरात लावलेल्या अभिनंदनाच्या फलकांचा अडथळा होत असल्याने नाशिक रस्त्याकडे कसे वळावे हेच समजत नाही. प्रवासी आणि मालवाहतूक गाड्याही येथेच उभ्या राहतात. अनेकदा मोठ्या गाड्यांना वळणदेखील घेता येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
शहरातील तीनही चौफुलींवर २४ तास वाहतूक पोलिसांनी नेमणूक आवश्यक आहे. अतिक्र मणाच्या मोहिमेत पोलीस चौकी जमीनदोस्त झाल्याने पोलिसांना येथे जागा नाही. त्यामुळे चौफुकीवर पोलीस नसल्याने वाहतूक कोंडी फोडण्यास वेळ लागतो. यामुळे अनेक वाहनधारकांमध्ये वाद होतात.
या वाहतुकीच्या कोंडीतून येवलेकरांची सुटका कोण करणार, असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे. रास्ता रोको आंदोलनासाठी वापरल्या जाणाऱ्या येवला-विंचूर चौफुलीवर राजकीय धुरिणांनी लक्ष घालून वाहतूक सिग्नल बसविण्यासाठी एकत्र येण्याची अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
४येवला-विंचूर चौफुलीवर वाहतूक सिग्नल यंत्रणा उभारणीची जुनी मागणी आहे. परंतु अद्यापही या मागणीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. चौफुलीवर मध्यभागी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शेड नसल्याने पोलीस येथे वाहतूक नियमनासाठी उभे राहू शकत नाही.
विंचूर चौफुलीसह प्रमुख मार्गावर सिग्नल बसवावेत. यामुळे अपघात कमी होण्यास मदत होईल आणि वाहतूक सुरळीत राहील. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.
- सुधाकर पाटोळे
वाहन चालक-मालक संघटना