निफाड रेल्वे गेटच्या बिघाडामुळे वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 06:28 PM2018-08-05T18:28:58+5:302018-08-05T18:29:12+5:30
निफाड : येथील रेल्वे स्टेशनच्या फाटकाची वायर शनिवारी( दि. ४) तुटल्याने निफाड-पिंपळगाव बसवंत रस्त्यावरील वाहतूक दीड ते दोन तास ठप्प झाल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. कुंदेवाडी आणि निफाडच्या बाजूने वाहनांच्या दोन ते तीन किमी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मुंबई-भुसावळ मार्गावर असलेल्या निफाड रेल्वे स्टेशनचे रेल्वे गेट वेगवेगळ्या कारणांनी सातत्याने बंद पडत असते. शनिवारी या रेल्वे फाटकाची वायर तुटल्याने रेल्वे गेट बंद होते. परिणामी निफाड, पिंपळगाव, शिर्डी, सुरत या मार्गावरील वाहनांना याचा त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे कुंदेवाडीच्या बाजूने एसटी बस उभ्या होत्या या बसमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी होते. गेट बंद झाल्याने या विद्यार्थ्यांना चार किमी पायपीट करीत निफाड महाविद्यालय गाठावे लागले.
निफाड रेल्वे गेटवर नेहमीच वाहनांची गर्दी असल्याने या ठिकाणी उड्डाण पूल बांधण्यास सुरु वात झाली आहे. निफाड रेल्वे स्टेशन येथे ३ वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे. रेल्वेच्या ट्रॅकवरील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले आहे. आता दोन्ही बाजूने पुलाला जोडणाऱ्या अतिरिक्त पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. उड्डाण पुलाचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत या गेटमुळे होणारी वाहतूक कोंडीची समस्या अशीच राहील. या पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी प्रवासी व ग्रामस्थांनी केली आहे.