कसारा घाटात बंद पडलेल्या ट्रेलरमुळे वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 02:04 AM2022-07-02T02:04:39+5:302022-07-02T02:05:03+5:30
जुन्या कसारा घाटातील हिवाळा ब्रिजजवळ शुक्रवारी (दि.१) सायंकाळी अचानक महामार्गावरील वळणावर अचानक ट्रेलर बंद पडला. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
इगतपुरी : जुन्या कसारा घाटातील हिवाळा ब्रिजजवळ शुक्रवारी (दि.१) सायंकाळी अचानक महामार्गावरील वळणावर अचानक ट्रेलर बंद पडला. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता जुन्या कसारा घाटात मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या हिवाळा ब्रिजजवळील वळणावर ट्रेलरवजा कंटेनर घाट चढत असताना अचानक बंद पडला. यामुळे मुंबईहून येणाऱ्या वाहनाला नाशिककडे जायला रस्ता बंद झाला होता. या घटनेची माहिती तत्काळ सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे व घोटी वाहतूक केंद्र पोलीस कर्मचारी यांना मिळताच, संपूर्ण टीमने क्रेनच्या साहाय्याने बंद पडलेला महाकाय ट्रेलर बाजूला करण्यात भर पावसात अवघ्या दोन तासांत यश मिळविले.
तोपर्यंत मुंबईवरून नाशिकला येणारी वाहतूक ही नवीन कसारा घाटाने वळविण्यात आली होती. त्यात धुके व जोरदार पाऊस पडत असल्याने, वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, दोन तासांनी कसारा घाट सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.