सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेमुळे इंदिरानगरला वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 01:44 AM2022-01-10T01:44:26+5:302022-01-10T01:44:43+5:30
देशभरातील सैनिकी शाळांमध्ये सहावी आणि नववीच्या प्रवेशासासाठी रविवारी (दि.९ ) शहरातील विविध केंद्रांवर राष्ट्रीय परीक्षा परिषदेतर्फे (एनटीए) ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रन्स एक्झाम (एआयएसएसईई) अर्थात राष्ट्रस्तरीय प्रवेश परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी परीक्षार्थींसोबत त्यांचे पालकही परीक्षा केंद्रावर आल्याने या भागात परीक्षा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.
नाशिक : देशभरातील सैनिकी शाळांमध्ये सहावी आणि नववीच्या प्रवेशासासाठी रविवारी (दि.९ ) शहरातील विविध केंद्रांवर राष्ट्रीय परीक्षा परिषदेतर्फे (एनटीए) ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रन्स एक्झाम (एआयएसएसईई) अर्थात राष्ट्रस्तरीय प्रवेश परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी परीक्षार्थींसोबत त्यांचे पालकही परीक्षा केंद्रावर आल्याने या भागात परीक्षा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.
सैनिक स्कूलच्या सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी रविवारपासून (दि. ९) परीक्षा सुरू झाली असून परीक्षेसाठी रविवारी सकाळी १२ वाजेपासूनच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी सहावी आणि नववीमध्ये प्रवेशासाठी सुमारे ५८४ विद्यार्थ्यी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सहावीच्या प्रवेशासाठी प्रविष्ट ३७८ विद्यार्थ्यांपैकी ३५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर २४ विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर होते. दुपारी २ ते ४:३० या वेळेत सहावीच्या प्रवेशासाठी ३०० गुणांची ही परीक्षा घेण्यात आली तर नववीच्या प्रवेशासाठी प्रवेशित २०६ विद्यार्थ्यांपैकी १८२ विद्यार्थ्यांनी ही २ ते ५ यावेळेत ४०० गुणांची परीक्षा दिली. या परीक्षेला २४ विद्यार्थी गैरहजर होते.
रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा
सैनिकी शाळांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी नाशिकमध्ये इंदिरानगर येथील केम्ब्रिज स्कूल हे एममेव केंद्र असल्याने या केंद्रावर विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. विशेष म्हणजे दुपारी १२ वाजेपासून परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केलेली असताना संभाव्य वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे सायंकाळी अचानक इंदिरा पाथर्डी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.