त्र्यंबक नाका चौकात वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:14 AM2021-03-08T04:14:50+5:302021-03-08T04:14:50+5:30
------- उद्यानांचे कोपरे मद्यपींचा अड्डा नाशिक : शहर परिसरातील विविध भागांत असलेल्या कानाकोपऱ्यातील अनेक उद्यानांचा ताबा मद्यपींनी घेतला आहे. ...
-------
उद्यानांचे कोपरे मद्यपींचा अड्डा
नाशिक : शहर परिसरातील विविध भागांत असलेल्या कानाकोपऱ्यातील अनेक उद्यानांचा ताबा मद्यपींनी घेतला आहे. सायंकाळपासून येथे मद्यपींचा वावर वाढला आहे. रात्री अंधाराचा फायदा घेत येथे अनेक मद्यपींचा धिंगाणा सुरू असतो. मद्यपी त्या उद्यानांच्या कोपऱ्यात बसून टोळक्याने त्यांचे कार्यक्रम साग्रसंगीत पार पाडतात. त्यामुळे उद्यानांलगतच्या परिसरातील इमारतींमध्ये राहणारे नागरिक त्रस्त झाले आहेत.
----------
सारडा सर्कलला पोलीस नेमण्याची मागणी
नाशिक : गंजमाळकडून सारडा सर्कलकडे येणारी वाहने उतारावरून अत्यंत वेगाने येत असतात. त्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकीचालक, रिक्षाचालक हे गंजमाळ येथून भरधाव वेगाने येतात. शहरातील हा महत्त्वाचा सिग्नल असून, रस्त्यावर सातत्याने वर्दळ सुरू असते. अशावेळी अनेक दुचाकीस्वार, रिक्षाचालक सिग्नलकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. या चौकात कधीही वाहतूक पोलीस दिसत नसल्यामुळे बेशिस्त वाहनधारकांचे चांगलेच फावत असल्याने वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी होत आहे.
---------
सातपूरमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
नाशिक : शहरातील सातपूर भागातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, वाहनचालकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने या भागातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी सातपूर गावठाण आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे.
---------
इंदिरानगर बोगद्याजवळ पूर्णवेळ पोलिसाची मागणी
नाशिक : शहरातून इंदिरानगरकडे जाणाऱ्या बोगद्याजवळ अनेकदा दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक काेंडी होते. अनेकवेळा या ठिकाणी वाहतूक पोलीस नसतात. कोंडीमुळे अनेकवेळा वाहनचालकांमध्ये हमरीतुमरीचे प्रकार घडतात. या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून सातत्याने होत असते.
-----
नवीन सीबीएससमोर दुतर्फा वाहने
नाशिक : नवीन सीबीएससमोर असलेल्या रस्त्यावर नवीन वाहनांना सजवण्याचे तसेच अन्य दुरुस्तीची कामे होत असल्याने या भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहने उभी असतात. त्यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण होत आहे. या भागातील वाहतूककोंडीमुळे वाहनचालक नाराजी व्यक्त करीत आहेत.
---
मुख्य रस्त्यावर अतिक्रमण
नाशिक : मेन रोडवर किरकोळ विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका आणि पोलिसांनी या भागातील किरकोळ विक्रेत्यांना हटविले होते. परंतु, लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर पुन्हा या भागात किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण करून दुकाने लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
----
उड्डाणपुलाखाली खासगी वाहने
नाशिक : उड्डाणपुलाखाली अनेक खासगी आणि अन्य मालट्रक उभी केली जात असल्याने प्रशासनाने या वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. व्दारका परिसरातील दोन्ही सर्व्हिस रोडवर गॅरेजची संख्या मोठी असल्याने तसेच अन्य व्यावसायिक गाळे असल्याने त्यांची वाहने ही द्वारका उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेत उभी केली जातात.