शहरात बेशिस्त वाहतुकीने कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 10:35 PM2020-06-01T22:35:06+5:302020-06-02T00:57:23+5:30
नाशिक : कोरोनामुळे लादलेले निर्बंध शिथिल केल्याने सोमवारपासून शहरातील सर्वच रस्त्यावर वाहनांची गर्दी होऊ लागली असून, रस्त्यावरील स्वयंचलित सिग्नल बंद असल्यामुळे बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. अनेक रस्त्यावर त्यामुळे लहान-मोठे अपघात तसेच वादविवादाच्या घटना घडू लागल्या आहेत.
नाशिक : कोरोनामुळे लादलेले निर्बंध शिथिल केल्याने सोमवारपासून शहरातील सर्वच रस्त्यावर वाहनांची गर्दी होऊ लागली असून, रस्त्यावरील स्वयंचलित सिग्नल बंद असल्यामुळे बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. अनेक रस्त्यावर त्यामुळे लहान-मोठे अपघात तसेच वादविवादाच्या घटना घडू लागल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने २३ मार्च पासून लॉकडाउन व संचारबंदी जारी केल्याने अत्यावश्यक सेवेची वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना मज्जाव करण्यात आला होता, त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्गावरील वाहतूक थंडावून रस्ते सामसूम झाले होते, रस्त्यावर वाहनच नसल्याने शहर वाहतूक शाखेने स्वयंचलित सिग्नल यंत्रणाही बंद केली, एरवी वाहनांची गर्दी, हॉर्नच्या गोंगाटाने गजबजून जाणारे रस्ते जवळपास एक महिनाभर शांत झाले होते. तथापि, लॉकडाउनचा तिसऱ्या टप्प्यात केंद्र व राज्य सरकारने संचारबंदी शिथिल केली, त्याचबरोबर लहान-मोठे उद्योग, व्यवसाय सुरू करण्याची अनुमती दिली, परिणामी जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात होऊन रस्त्यावर मोजके वाहने धावू लागली होती. आता मात्र सरकारने अनलॉक जाहीर केल्यामुळे मोठ्या प्रमावर नागरिक घराबाहेर पडू लागले असून, प्रत्येकालाच घाई असल्यागत वाहने रस्त्यावर दामटवली जात असल्याने वाहतूक विस्कळीत होण्याची व वाहनांची कोंडी होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा सर्व परिस्थितीत शहर वाहतुकीचे नियंत्रण करण्याची जबाबदारी असलेल्या वाहतूक पोलिसांचे मात्र रस्त्यावर कोठेही अस्तित्व जाणवत नाही.
-------------------------
बेशिस्त वाहतूक, त्यात अडथळ्यांची भर
शहरात वाहतुकीचे तीन तेरा वाजलेले असताना त्यात पोलीस यंत्रणेने अनेक मार्गावर कोरोनाच्या निमित्ताने अडथळे उभे केले आहेत, काही रस्ते अंशत: खुली आहेत तर काही पूर्ण बंद आहेत, त्यामुळेदेखील अन्य पयार्यी रस्त्यावर वाहतुकीचा ताण पडून त्यातून वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण घडत आहे. शहर जर सरकारच्या आदेशाने व्यवसाय व उद्योगासाठी खुले केले आहे तर रस्ते कोणाच्या आदेशाने बंद आहेत, असा सवाल केला जात आहे.
--------------------------
शिस्तीची गरज
वाहनचालकांकडून वाहतुकीचे नियम भंग होत असल्याने त्यातून लहान-मोठे अपघात, वाहनचालकांची हमरीतुमरीच्या घटना घडू लागल्या आहेत. हा सारा प्रकार शहरातील प्रत्येक रस्त्यावर घडत असताना मात्र रस्त्यावर कोठेही वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करताना दिसत नाही. सिग्नल बंद असल्यामुळे तर वाहतूक नियोजनाचे बारा वाजले असून, काही चालक सुसाट वेगाने वाहन हाकत आहेत. शहरातील वाहतुकीला पोलिसांनी शिस्त लावण्याची मागणी केली जात आहे.