कॉलेजरोड भागात वाहतुकीचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:14 AM2021-02-15T04:14:24+5:302021-02-15T04:14:24+5:30
रविवारची सुटी अन् ‘व्हॅलेण्टाइन डे’ असल्यामुळे संध्याकाळी अचानकपणे कॉलेजरोड, येवलेकर मळा, कृषीनगर सायकल सर्कल, मॉडेल कॉलनी, डिसूझा कॉलनी, गंगापूररोडवरील ...
रविवारची सुटी अन् ‘व्हॅलेण्टाइन डे’ असल्यामुळे संध्याकाळी अचानकपणे कॉलेजरोड, येवलेकर मळा, कृषीनगर सायकल सर्कल, मॉडेल कॉलनी, डिसूझा कॉलनी, गंगापूररोडवरील शहीद सर्कल, प्रसाद सर्कल आदी भागात वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. संध्याकाळी ६ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत या भागात वाहतूक कोंडी कायम होत होती. मॉडेल कॉलनीपासून डिसूझा कॉलनीमधून शहीद चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच कॉलेज रोडवरील कुलकर्णी सर्कलपासून तर कृषिनगर कॉर्नरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या चारचाकींच्या अवैध पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता. या दोन्ही रस्त्यांवर असलेले कॅफे, रेस्टॉरंट, चहा स्टॉल, चॅट भांडार, स्वीटची दुकाने विविध शोरूमबाहेर थेट रस्त्यापर्यंत वाहने उभी होती. या भागात मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी लोटल्यामुळे हा परिसर संध्याकाळी गजबजून गेला होता. ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याने हॉर्नचा कर्णकर्कश आवाजाने निर्माण होणारा गोंगाट अशी स्थिती निर्माण झाली असताना कुठल्याही चौकात किंवा सिग्नलवर वाहतूक पोलीस नजरेस पडले नाही. वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे वाहनांचा एकमेकांना धक्का लागल्याने अनेकठिकाणी वादविवादाचे प्रसंगही उद्भवत होते. यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या भागात वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे असताना शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून पूर्णत: याकडे काणाडोळा करण्यात आला. केवळ कृषिनगर जॉगिंग ट्रॅकजवळ रात्री ८ वाजेपर्यंत करण्यात आलेल्या नाकाबंदीव्यतिरिक्त वरील सर्व भागात कोठेही पोलीस नजरेस पडले नाही. कॉलेजरोड पोलीस चौकीजवळ असतानाही मॉडेल कॉलनी सर्कलवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा उशिरापर्यंत निघालेला नव्हता हे विशेष!