रस्त्यावर वाहनांची तुरळत ये-जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:14 AM2021-04-24T04:14:43+5:302021-04-24T04:14:43+5:30
एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या मृत्यूने हळहळ नाशिक : कोरोनामुळे अनेक घरांमध्ये शोककळा पसरली असून, एकाच घरातील दोन-तीन व्यक्तींचा एक-दोन ...
एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या मृत्यूने हळहळ
नाशिक : कोरोनामुळे अनेक घरांमध्ये शोककळा पसरली असून, एकाच घरातील दोन-तीन व्यक्तींचा एक-दोन दिवसांच्या अंतराने मृत्यू होत असल्याचे प्रसंगही काही घरात घडले आहेत. यामुळे संपूर्ण मोहल्ल्यावरच शोककळा पसरली असल्याचे चित्र दिसत असून, नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
छोट्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले
नाशिक : कडक लॉकडाऊनमुळे अनेक छोट्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, त्यांच्यासमोर अनेक आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. व्यवसाय बंद झाल्याने पुढील काळात बँकांचे हप्ते, मुलांची फी, घरभाडे आदी खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
दुपारनंतर परिसरांमध्ये शुकशुकाट
नाशिक : सकाळी ११ वाजेपर्यंतच दुकाने सुरू राहात असल्याने दुपारनंतर बाजार परिसरात शुकशुकाट पसरतो. दुकान बंद होण्यापूर्वी आवश्यक ते साहित्य खरेदीसाठी नागरिक दुकानांमध्ये गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. दुकानाची वेळ निश्चित केल्यामुळे रस्त्यांवरील गर्दी कमी झाली आहे.
भाजीपाल्याच्या दरावर मोठा परिणाम
नाशिक : लॉकडाऊनचा भाजीपाल्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, दर कोसळले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. गतवर्षीही भाव कोसळल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली होती. सध्या व्यापाऱ्यांकडून मोजकीच खरेदी केली जात असल्याचे दिसते.
अनेक वस्तूंची अव्वाच्या सवा दराने विक्री
नाशिक : मालाची वाहतूक सुरू असली तरी शहरात अनेक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला असून, विक्रेत्यांनी या वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अव्वाच्या सव्वा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
कोरोनाग्रस्त कुटुंबांना संस्थांची मदत
नाशिक : अनेक घरांमध्ये संपूर्ण कुटुंबच कोराेनाग्रस्त झाल्याने या कुटुंबांना काही सेवाभावी संस्थांकडून जेवण पुरविले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा कुटुंबांची माहिती घेऊन त्यांना गरज असल्यास त्यांना घरपोहोच डबे पुरविण्याचे काम या संस्थांनी सुरू केले आहे. यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
शहरातील अनेक भागात बॅरिकेडिंग
नाशिक : लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी शहरातील पोलीस रस्त्यावर उतरले असून, अनेक भागात बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. चौकाचौकात पोलीस दिसत असून, काही ठिकाणी वाहनांची तपासणीही केली जात आहे. यामुळे गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात येत आहे.