नाशिकमध्ये वाहतूक पोलीसांशी वाद झाल्याने व्यापारपेठ बंद; एमजीरोडवरील घटना
By संजय पाठक | Published: August 2, 2023 01:14 PM2023-08-02T13:14:39+5:302023-08-02T13:15:02+5:30
व्यापाऱ्यांकडून नो पार्कींगचा दंड घेतल्याने बाचाबाची
संजय पाठक, नाशिक- शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या महात्मा गांधी रोडवर आज सकाळी वाहतूक पोलीसांनी व्यापाऱ्यांच्या वाहनांचे फोटो काढून पाचशे रूपये दंड आकारण्यात आल्याने वाद निर्माण झाले आहे. या व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद केल्या असुन निदर्शने सुरू केली आहेत.
नाशिक शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या एमजी रोडवर स्मार्ट सिटीने पिवळे पट्टे पार्कींगसाठी मारले हाेते. त्याच्या आतच व्यापारी वाहने लावत होते. मात्र, स्मार्ट सिटी कंपनीने फुटपाथची रूंदी वाढवली असून त्यामुळे वाहने रस्त्यावर आली आहेत. आज सकाळी नाशिकच्या वाहतूक पेालीसांनी अचानक याठिकाणी कारवाई सुरू केली आणि दुकान मालकांनाच पाचशे रूपयांच्या पावत्या दिल्या. त्यावरून वाद झाल्यावर वाहतूक पोलीसांनी पिवळे पट्टे छोटे असल्याने नॅनो गाड्या घ्या असा सल्ला दिल्याने व्यापारी अधिकच भडकले.
त्यांनी बाजारपेठ बंद केली असून या मार्गावरच निदर्शने सुरू केली आहेत.
एमजीरोडच्या वाहतूक समस्येेवर तेाडगा काढण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याचे येथील व्यापारी रवी पारख यांनी सांगितले.