वाहतूक पोलिसाच्या ‘वर्दी’ला हिसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:36 AM2019-03-10T00:36:14+5:302019-03-10T00:38:08+5:30
रिक्षाचालक बेशिस्त, उर्मट व उद्धटपणे वागतात, अशी सर्वसामान्यांची तक्रार असते. या तक्रारीचा अनेकदा बागुलबुवा केला जातो. असाच अनुभव सीबीएससारख्या सिग्नलवर कर्तव्य बजावत असताना वाहतूक शाखेच्या पोलिसांना आला. रिक्षाचालकांनी त्यांच्याशी अरेरावी करत थेट त्यांच्या ‘वर्दी’लाच हात घातल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे.
नाशिक : पाचही बोटे सारखी नसतात, हे खरे असले तरी एक व्यक्ती चुकीची वागली तर संपूर्ण क्षेत्र बदनाम होते, हेदेखील सत्य आहे. रिक्षाचालकांच्या बाबतीत असे नेहमीच घडत आले आहे. रिक्षाचालक बेशिस्त, उर्मट व उद्धटपणे वागतात, अशी सर्वसामान्यांची तक्रार असते. या तक्रारीचा अनेकदा बागुलबुवा केला जातो. असाच अनुभव सीबीएससारख्या सिग्नलवर कर्तव्य बजावत असताना वाहतूक शाखेच्या पोलिसांना आला. रिक्षाचालकांनी त्यांच्याशी अरेरावी करत थेट त्यांच्या ‘वर्दी’लाच हात घातल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे.
घडलेला सविस्तर प्रकार असा, रिक्षाचालक संशयित गजानन प्रकाश दुधाडे (२१, रा. श्रमिकनगर) हा त्याची रिक्षा (एम.एच. १५, ई.एच ०५८६) घेऊन शुक्रवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास ‘फ्रंट सीट’ बसवून सीबीएस चौकात आला. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करण्याच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याची रिक्षा क र्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस हवालदार द्वारिका परशुराम यादव (५०) यांनी थांबविली. त्याचा राग चालक दुधाडे याच्या शेजारी बसलेला रिक्षामालक स्वप्नील सुरेश गुरव याला आला. त्याने यादव यांच्याशी अरेरावी केली. त्यांच्या वर्दीची कॉलर धरत जोरात हिसका दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या मानेला दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, हा वादविवाद सुरू असताना यादव यांच्या मदतीला कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई सोमनाथ गायकवाड यांनी धाव घेतली असता गुरव याने त्यांनाही न जुमानता दुधाडे यानेही वादात सहभागी होत गायकवाड यांच्या वर्दीवरील नावाची पाटी हिसका देत तोडून शासकीय कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुरव व दुधाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.