खासगी वाहनांतून विद्यार्थी वाहतूक !
By Admin | Published: August 27, 2016 10:39 PM2016-08-27T22:39:09+5:302016-08-27T22:39:28+5:30
खासगी वाहनांतून विद्यार्थी वाहतूक !
पंचवटी : खासगी वाहनांतून अवैधरीत्या शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, खासगी वाहनधारकांनी विद्यार्थ्यांची वाहतूक थांबवावी, अन्यथा प्रादेशिक परिवहन विभागामार्फत मोटार कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.
गेल्या महिन्यात पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या १२ व्या बैठकीत शाळेच्या परिसरात अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे सर्वेक्षण व वाहनांच्या परवान्यावर रूपांतर करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने या कार्यालयामार्फत शहरातील शाळांमध्ये करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात वाहनधारक आपल्या मालकीचे खासगी वाहन हे शाळकरी मुलांची वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. खासगी वाहनात शाळकरी विद्यार्थी वाहतूक करणे अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे व मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीर बाब असल्याने अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांना अंतिम ताकीद देण्यात आली आहे. अवैधपणे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनधारकांनी विद्यार्थी वाहतूक त्वरित थांबवावी, तसेच भविष्यात अशाप्रकारे वाहतूक पुन्हा झाल्यास संबंधितांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. खासगी वाहनधारकांनी अवैध विद्यार्थी वाहतूक थांबवावी यासाठी जवळपास १५१ वाहनधारकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)