वाहतूक कोंडी सुटता सुटेना!
By Admin | Published: September 1, 2016 10:35 PM2016-09-01T22:35:52+5:302016-09-01T22:36:31+5:30
मोहदरी घाट : सिन्नर-नाशिक प्रवास बनला डोकेदुखी; रोजच्या त्रासाने चाकरमाने, विद्यार्थी हैराण
सिन्नर : नाशिक - पुणे महामार्गावर सिन्नरजवळील मोहदरी घाटात दोन ट्रक नादुरुस्त झाल्याने सकाळी ७ वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे सहा तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली. सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे गेल्या काही दिवसांपासून सिन्नर-नाशिक प्रवास डोकेदुखी ठरत आहे.
सिन्नर - नाशिक महामार्गाच्या चौपदरीकरणाला गेल्या अनेक वर्षांपासून मुहूर्त मिळत नव्हता. सिंहस्थ कुंभमेळा झाल्यानंतर या मार्गाचे काम सुरू झाले. गेल्या तीन महिन्यांपासून मोहदरी घाट रुंद करण्याच्या कामाने वेग घेतला आहे. मोहदरी घाटात रुंदीकरणाचे काम सुरू असतानाच या घाटात अवजड वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. एखादे अवजड वाहन नादुस्त
झाल्यास किंवा अपघात झाल्यास प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागतो.
गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मोहदरी घाटात एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने तो रस्त्यात उभा होता. बेशिस्त वाहनचालकांमुळे सकाळी ७ वाजेपासून वाहतूक कोंडीस प्रारंभ झाला. एमआयडीसी पोलिसांनी मोहदरी घाटात धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तथापि, दोन्ही बाजूने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर पुन्हा मोहदरी घाटात दुसरा ट्रक नादुरुस्त झाला. त्यामुळे पूर्ववत होऊ पाहणारी वाहतूक कोंडी पुन्हा वाढली. त्यानंतर महामार्ग वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी.आर. मोकळ, पी.एम. बहिरम, बी.एन. शिंदे, आनंददीप पवार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. दुपारी १ वाजेच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.
मोहदरी घाटात सोमवारीही प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सोमवारी रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीचा पाण्याचा टॅँकर रस्त्यावर घसरल्याने सुमारे दोन तास वाहतूक कोंडी झाली होती.
रस्त्याचे काम सुरूअसल्याने गेल्या सहा महिन्यांपासून आठवड्यातील तीन ते चार दिवस मोहदरी घाटात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे दररोज सिन्नर-नाशिक जा-ये करणाऱ्या चाकरमान्यांचे व शिक्षणासाठी नाशिकला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. प्रवाशांनाही या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)