गुलमोहराचे झाड कोसळल्याने त्र्यंबक रोडवरील वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:18 AM2021-09-12T04:18:38+5:302021-09-12T04:18:38+5:30
नाशिक : शहरातील मायको सर्कल परिसरात नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पावसामुळे गुलमोहराचे झाड कोसळून पडल्याची घटना शनिवारी (दि.११) सायंकाळी ६ ...
नाशिक : शहरातील मायको सर्कल परिसरात नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पावसामुळे गुलमोहराचे झाड कोसळून पडल्याची घटना शनिवारी (दि.११) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे या भागातील वाहतूक एकेरी मार्गावरून वळविण्यात आल्याने नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर वाहनांची कोंडी होऊन काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती, परंतु घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत, कटरच्या साह्याने झाड कापून रस्त्यावरून बाजूला केल्याने पुन्हा वाहतूक सुरळीत झाली.
मायको सर्कल परिसरात शनिवारी सायंकाली मोठे गुलमोहराचे झाड कोसळल्याची घटना घडल्यानंतर, या भागात मोठ्या प्रमाणात गडकरी चौक आणि चांडक सर्कलकडून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाली होती. त्यामुळे घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी व परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या मुख्यालयातील लीडिंग फायरमन श्याम राऊत, वाहन चालक शरद देटके, फायरमन तानाजी भास्कर, अनिल गांगुर्डे, विजय शिंदे, ज्ञानेश्वर दराडे यांनी घनास्थळी धाव घेत, पोलिसांच्या मदतीने अवघ्या अर्ध्या तासाच्या कालावधीत झाड कटरच्या साह्याने कापून रस्त्यावरून बाजूला केले. त्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाल्याने वाहन चालकांनी सुटकेचा श्वास टाकला. दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी वाहतूककोंडी टाळण्यासाठी या भागातून एकेरी वाहतुकीला रस्ता खुला करून दिला होता.
110921\11nsk_42_11092021_13.jpg~110921\11nsk_43_11092021_13.jpg
गुलमोहराचे झाड कोसळल्याने त्र्यंबकरोडवरील वाहतूक विस्कळीत ~गुलमोहराचे झाड कोसळल्याने त्र्यंबकरोडवरील वाहतूक विस्कळीत