जलतरण तलावांमध्ये प्रशिक्षित जीवरक्षक
By admin | Published: November 5, 2015 12:01 AM2015-11-05T00:01:23+5:302015-11-05T00:01:23+5:30
आवश्यकशासनाचे आदेश : बांधकाम परवानगीतच नियम
नाशिक : महापालिका हद्दीत यापुढे खासगी जागेत जलतरण तलाव उभारताना त्यावर प्रशिक्षित जीवरक्षक घेण्याचा नियम बांधकाम परवानगीतच समाविष्ट करण्याचे आदेश शासनाच्या नगरविकास विभागाने दिले आहेत.
वाढते औद्योगिकीकरण आणि उपलब्ध पायाभूत सुविधांमुळे शहरांमध्ये मोठे गृहप्रकल्प उभे राहात आहेत. या गृहप्रकल्पांमध्ये खासगी जलतरण तलावांची निर्मिती करून ग्राहकांना आकर्षित करण्यात येते. खासगी विकासकांमार्फत गृहप्रकल्पांमध्ये उभारण्यात येणाऱ्या जलतरण तलावांचे व्यवस्थापन, जीवरक्षक पात्रता यावर स्थानिक नियोजन प्राधिकरणाचे नियंत्रण नसते. पोहणाऱ्यांचा जीव वाचावा यासाठी जीव रक्षकांची नेमणूक केली जात असते. परंतु काही ठिकाणी ज्यांना पोहता येत नाही अशा लोकांची नेमणूक करत त्यांना जीवरक्षकाचे प्रमाणपत्र देण्यात येते. जीवरक्षकाने केवळ पोहणाऱ्यांना वाचवायचे नसते, तर आपत्कालीन स्थितीत पोहणाऱ्याला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे, पोटातून पाणी बाहेर काढणे, त्याला प्रथमोपचार देणे गरजेचे असते. माणसाचा जीव वाचविण्यासाठी जीवरक्षकाला सर्व ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यासाठीच शासनाने यापुढे शहरात कुठेही खासगी जलतरण तलावाची उभारणी करावयाची असल्यास त्यामध्ये प्रशिक्षित जीवरक्षक नेमणे बंधनकारक केले आहे. तसा नियमच बांधकाम परवानगी देताना समाविष्ट केला जाणार आहे.