३५० प्रतिनिधींनी घेतले प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 11:37 PM2019-04-05T23:37:57+5:302019-04-05T23:41:20+5:30
सिन्नर : पानी फाउण्डेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतर्फे सहभागी होण्यासाठी दुसऱ्या वर्षीही तालुक्यातील अनेक गावे सज्ज झाली आहेत. ८ एप्रिल ते २२ मेदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत सहभागासाठी ९२ गावांतील ३५० प्रतिनिधींनी जलसिंचन व स्पर्धेतून विविध तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

गतवर्षी मोठ्या प्रमाणात जलजागृती करूनही पानी फाउण्डेशनच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये मोजक्याच गावांनी सहभाग नोंदवला होता. तथापि, ज्या गावांनी सहभाग घेऊन पाण्याचे महत्त्व जाणले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणखी काही गावांनी सज्जता दाखवली आहे.
त्यामुळेच चांदवड तालुक्यातील कळमदरे, संगमनेर तालुक्यात म्हसवंडी तसेच राळेगणसिद्धी येथे स्पर्धेसंदर्भातील प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. आता श्रमदान व मशीन कामांना सुरुवात झाली आहे. स्पर्धेपूर्वी ३० गुणांची कामे ग्रामस्थ करून शकतात. त्यात शोषखड्डे घेणे, परसबाग बनविणे, वृक्षसंवर्धन करणे, वॉटर बजेट ठरवणे, जलबचतीचे काम करणे, आगपेटीमुक्त शिवार अभियान राबविणे आणि माती परिक्षण करणे आदी कामांचा समावेश आहे. ही कामे स्पर्धा काळातही करता येऊ शकतात.
वॉटर कप स्पर्धेची जय्यत तयारी झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक गावांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून जलसमृद्धीच्या दिशेने पाऊल टाकावे असे आवाहन पानी फाउंडेशनच्या टीमच्या वतीने करण्यात आले आहे. आठवडाभरात मोबाइल अॅप तसेच विहिरींची पातळी मोजण्याबाबतचे प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याची माहिती समन्वयकांनी दिली. हिवरे, सोनांबे, पाटपिंप्री, पाटोळे, वडझिरे, कोनांबे, घोरवड व चिंचोली आदी गावांमध्ये टीमने पाणलोटाच्या कामांबाबत मार्गदर्शन केले. तत्पूर्वी ४० गावांमध्ये एकदिवसीय शिबिरही घेण्यात आले आहे.