डिजिटल कार्यक्रमातून शिक्षकांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 09:19 PM2020-09-03T21:19:35+5:302020-09-04T00:52:13+5:30
कळवण : कोरोनाच्या संकटामुळे काही शाळांमध्ये आॅनलाइन माध्यमातून शिक्षण सुरू केले असले तरी बरेच शिक्षक अजूनही या माध्यमाशी जुळवून घेऊ शकलेले नाहीत. त्यांना सहाय्य म्हणून रोटरी इंडिया साक्षरता अभियान अंतर्गत रोटरी क्लबच्या वतीने स्मार्ट अध्यापनासाठी डिजिटल कौशल्य मार्गदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून सातशे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे क्लबचे सेक्रेटरी नीलेश भामरे यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क

रोटरी क्लब आॅफ कळवणच्या वतीने रोटरी इंडिया साक्षरता अभियान या कार्यक्रमातून पाच दिवस चालणाऱ्या या उपक्रमातून शिक्षकांना तंत्रज्ञानातील पंधरा कौशल्य शिकवण्यात आले. त्यासाठी कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, आश्रमशाळांतील शिक्षकांचे सात व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून दररोज तीन कौशल्याचे व्हिडिओ आणि त्यावरील प्रश्न पाठवले.
या कौशल्यावर पुढील दिवशी प्रश्नांची उत्तरे देणारा व्हिडिओ, नवीन कौशल्यांचा व्हिडिओ आणि त्यावरील प्रश्न या स्वरूपात प्रशिक्षण देण्यात आले. यात प्रामुख्याने शिक्षकांना मोबाइल लॅपटॉपवर हॉट स्पॉट जोडणे, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन कसे करावे, व्हॉइस रेकॉर्ड, गुगल ड्राइव्ह, स्कॅनर, यू-ट्यूब चॅनल निर्मिती, गुगल डॉक्युमेंट, गुगल क्लासरूम, झूम अॅप, गुगल मॅप टेलिग्राम या सर्वांच्या वापराबाबत संबंधित व्हिडिओ पाठविले गेले व सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सहाव्या दिवशी सराव करण्यात येऊन सातव्या दिवशी एक ५० प्रश्नांची आॅनलाइन टेस्ट घेतली गेली. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना लगेच सहभागाचे इ- प्रमाणपत्र ई-मेलवर पाठविण्यात आले. उपक्रम राबविण्यासाठी गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव, रोटरी नाशिकचे जिल्हा प्रकल्प समन्वयक सलीम बटाडा, कळवण रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेश मुसळे या प्रकल्पाचे संचालक नीलेश भामरे, विषयतज्ज्ञ अभिनंदन धात्रक, उपप्रांतपाल जितेंद्र कापडणे, विलास शिरोरे, रवींद्र पगार, रोटरीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.रोटरी इंडिया साक्षरता अभियानाच्या माध्यमातून शिक्षकांना स्मार्ट अध्यापनातील पंधरा कौशल्य शिकायला मिळाले. लॉकडाऊनच्या काळात या डिजिटल कौशल्यामुळे तालुक्यातील शिक्षक नक्कीच अपग्रेड झाले आहेत. आॅनलाइन अध्यापनासाठी शिक्षकांना या कौशल्याचा उपयोग होणार आहे.
- हेमंत बच्छाव, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, कळवण